आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवद्गीता लोक केवळ घरात ठेवतात, वाचन कोणी करत नाही - मोहन भागवत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भगवद्गीता केंद्र सरकारने राष्ट्रीय ग्रंथ म्हणून जाहीर करावा, असे प्रतिपादन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी काही दिवसांपूर्वी केलेले असताना खुद्द सरसंघचालक मोहन भागवत यांनी भगवद्गीता लोक केवळ घरात ठेवतात, त्याचे वाचन कोणी करत नाही, अशी खंत मंगळवारी व्यक्त केली. विवेक साप्ताहिकाच्या हीरक वर्षानिमित्त मुंबईत मोहन भागवत यांच्या हस्ते "समग्र वंदे मातरम्' या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. भागवत म्हणाले, गेल्या १४० वर्षांच्या वंदे मातरम् गीताचा प्रवास या ग्रंथात संकलित केला आहे.
प्रत्येकाने हा ग्रंथ खरेदी केला पाहिजे. लोक ग्रंथ खरेदी करतात; पण वाचत नाहीत. भगवद्गीतेचे असेच झालेले आहे. वंदे मातरम् ग्रंथाचे असे होईल, तरीही असे ग्रंथ संपत नसतात. म्हणून असे प्रेरणादायी ग्रंथ घरी असणे आवश्यक आहे. तुम्ही वाचले नाहीत, तरी पुढची पिढी वाचन करील.
वंदे मातरम् गीत बंगालने देशाला दिलेली अमूल्य भेट आहे. या गीताला काही लोक विरोध करतात, ही दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे; पण अशा विरोधकांना नामोहरम करण्याची ताकद या गीतामध्ये आहे, असे महाराष्ट्राचे राज्यपाल सी. विद्यासागर राव म्हणाले.

वंदे मातरम् या ग्रंथाचे संपादन मिलिंद सबनीस यांनी केले आहे. या वेळी वंदे मातरम् गीताचे रचनाकार बंकिमचंद्र चॅटर्जी यांचे वंशज शंतनुचंद्र चॅटर्जी यांनी मनोगत व्यक्त केले. १९७१ च्या पाकिस्तानबरोबरील युद्धात सहभागी सैनिकांचा आणि शहिदांच्या नातेवाइकांचा या वेळी सत्कार करण्यात आला.