आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Major Relief To 17 Lakh Mumbaikar Families! Govt Not To Increase Property Tax For Next 5 Yrs For Those Who Own Occupy Less Than 500 Sq. Ft. Property

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईत छोट्या घरांच्या घरपट्टीत पुढील 5 वर्षे वाढ नाही- मुख्यमंत्री, राष्ट्रवादीची टीका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील 500 चौरस फुट किंवा त्यापेक्षा कमी चटई क्षेत्रफळाच्या निवासी सदनिका आणि निवासी गाळ्यांच्या मालमत्ता करात पुढील 5 वर्षे वाढ न करण्याचा निर्णय घेऊन सरकारने सुमारे 17 लाख मालमत्ताधारकांना मोठा दिलासा दिला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

या महत्त्वपूर्ण निर्णयाची अंमलबजावणी 1 एप्रिल 2015 पासून होणार आहे. बृहन्मुंबई महापालिकेने भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली स्वीकारली असून त्यानुसार विविध मालमत्तांवर कराची आकारणी केली जाते. मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888 मधील कलम 140 ए मधील तरतुदीनुसार महानगरपालिका क्षेत्रांमधील सर्वच मालमत्तांच्या करामध्ये 40 टक्के इतकी वाढ होणार आहे. त्यामुळे या अधिनियमात सुधारणा करुन निवासी वापरकर्त्या लहान सदनिकाधारक आणि गाळेधारकांच्या करात वाढ न करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबईमधील 500 चौरस फुट (46.45 चौरस मीटर) किंवा त्यापेक्षा कमी क्षेत्रफळाच्या लहान सदनिका आणि गाळे हे बहुतांश जुन्या इमारतींमधील आहेत. त्यांची संख्या 16 लाख 79 हजार 265 इतकी असून या इमारती सध्या विविध योजनांखाली पुनर्विकसित होत आहेत. अशा सर्वसामान्य परिस्थितीतील लहान निवासी सदनिका आणि गाळ्यांना करवाढीतून सूट दिल्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुख्यमंत्री मालमत्ताकराबाबत थापा मारत आहेत- राष्ट्रवादी काँग्रेस
दरम्यान, 500 चौरस फुटांपेक्षा लहान घरांवरील घरपट्टी वाढवली जाणार नाही, अशी तरतूद भांडवली मूल्यावर आधारित करप्रणाली कायद्यात केलेली असताना घरपट्टी न वाढवण्याची खोटी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहेत अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले, महाराष्ट्रात भांडवली मूल्यावर आधारित नवी करप्रणाली लागू झाली, तेव्हा मी त्या समितीचा सदस्य म्हणून काम पाहिले होते. 500 चौरस फुटांपेक्षा लहान घरांवरील घरपट्टी वाढवली जाणार नाही, अशी तरतूद या कायद्यात तेव्हाच केलेली होती. मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता ट्विटरच्या माध्यमातून ही घरपट्टी न वाढवण्याची घोषणा करीत आहेत. केंद्रातील मोदी सरकारप्रमाणे राज्यातील फडणवीस सरकारही जनतेला भूलथापा देण्याचे काम करत आहे, अशी टीका मलिक यांनी केली आहे.

महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या मर्यादेत 962 कोटींची वाढ-
महाराष्ट्र आकस्मिकता निधीच्या 150 कोटी इतक्या कायमच्या मर्यादेत जास्तीच्या 962 कोटी रुपयांची तात्पुरती वाढ करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईसाठी 630.74 कोटी रुपये, फेब्रुवारी व मार्च 2015 मध्ये झालेला अवेळी पाऊस व गारपिटीमुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी 281 कोटी आणि जलयुक्त शिवार अभियानासाठी जलसंधारण विभागास अतिरिक्त 50 कोटी रुपये निधी देण्यासाठी ही वाढ करण्यात आली आहे. या निधीची मर्यादा 150 कोटी असून त्यात ही अतिरिक्त 962 कोटी वाढ करण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्याचा आकस्मिक निधी हा मुंबई आकस्मिकता अधिनियम 1956 अन्वये स्थापन करण्यात आला आहे. दिनांक 11 एप्रिल 1990 पासून याची कायमस्वरुपी मर्यादा 150 कोटी रुपये आहे. या मर्यादेत तात्कालिक कारणांमुळे (उदा. नैसर्गिक आपत्ती निवारण खर्च, धोरणात्मक निर्णयापोटी करावयाचा नवीन खर्च) वेळोवेळी तात्पुरती वाढ करावी लागते.
बातम्या आणखी आहेत...