आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकचा नको, कागदीच राष्ट्रध्वज फडकवा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्लास्टिकचे राष्ट्रध्वज पायदळी तुडवले जातात. त्यामुळे विद्यार्थी शैक्षणिक संस्थांच्या आवारात केवळ कागदी राष्ट्रध्वजाचा वापर करतील याकडे शिक्षकांनी डोळ्यात तेल घालून लक्ष द्यावे, अशी तंबी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने दिली आहे. ध्वजसंहितेतील तरतुदीत फक्त कागदापासून बनवलेले राष्ट्रध्वज वापरण्यात यावेत असे म्हटलेले आहे. अलीकडे मात्र सरसकट प्लास्टिक राष्ट्रध्वज वापरण्यात येतात. कार्यक्रमानंतर असे राष्ट्रध्वज पायदळी येतात. प्लास्टिकचे असल्याने ते बरेच दिवस रस्त्यावर कच-यात जातात.

राष्ट्रध्वजाच्या या अपमानजनक संदर्भात विश्व हिंदू परिषदेने मुंबई उच्च न्यायालयात २०११ मध्ये जनहित याचिका दाखल केली होती. त्याची नुकतीच सुनावणी झाली. त्यामध्ये राष्ट्रध्वजाच्या वापराबाबत जनजागृती करण्याबाबत तसेच फाटलेल्या राष्ट्रध्वजाची ध्वजसंहितेच्या तरतुदीनुसार विल्हेवाट लावण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने सोमवारी परिपत्रक काढले आहे. त्यामध्ये प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर विद्यार्थ्यांनी करू नये. याबाबत मान्यताप्राप्त शाळा, महाविद्यालये तसेच मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थांना खात्री करण्याच्या सूचना दिल्या आहेत.