आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - गेल्या वर्षी 21 जून रोजी मंत्रालयात लागलेल्या आगीत कोणताही घातपात नव्हता, तर शॉर्टसर्किटमुळे ती लागल्याचा अहवाल गुन्हे अन्वेषण विभागाने नुकताच मुख्यमंत्र्यांना सादर केला आहे. त्यामुळे या आगीबाबत विरोधकांनी नोंदवलेल्या आक्षेपांवर आता पडदा पडला आहे.
सात महिन्यांपूर्वी मंत्रालयाच्या चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या मजल्याला आग लागली होती. या आगीत या मजल्यांवरील सर्व कागदपत्रे आणि मालमत्ता जळून खाक झाली होती. चौथ्या मजल्यावर लागलेली ही आग काही वेळातच भडकून तीन मजले भस्मसात झाले. त्यामुळे ही आग भडकण्यामागे काही षडयंत्र आहे का याची चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे आणि विनोद तावडे यांनी विधिमंडळात केली होती. ही आग लागल्यानंतर काही महत्त्वाची कागदपत्रे जळावीत यासाठी प्रयत्न केला केला गेला का किंवा त्यासाठीच ही आग लावली गेली होती का याची चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार सरकारने गुन्हे अन्वेषण विभागाला या आगीची चौकशी करण्याचे आदेश दिले होते.
अहवाल मुख्यमंत्र्यांकडे
सहपोलिस आयुक्त हिमांशू रॉय यांनी नुकताच मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अहवाल सादर केला आहे. आगीमागे कोणतेही षड्यंत्र नव्हते, तर चौथ्या मजल्यावरील माहिती आणि तंत्रज्ञान विभागातील इलेक्ट्रिक स्विच बोर्डात झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे विरोधकांच्या तर्कांवर आता पडदा पडला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.