आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Question Of Resignation By Ajit Pawar Says Madhukar Pichad

\'दादांच्या राजीनाम्याचा प्रश्नच नाही\' ; शरद पवार आज मौन सोडणार?

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वादग्रस्त विधानावर माफी मागूनही विरोधक त्यांच्या राजीनाम्याचे राजकारण करत आहेत. पवारांनी राजीनामा देण्याचा प्रश्नच येत नसून, विरोधकांना राष्ट्रवादी काँग्रेस राजकीय उत्तर देईल, असा इशारा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी शुक्रवारी दिला.

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित महिला जिल्हाध्यक्षांच्या शिबिरानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या कार्यक्रमाला केंद्रीय कृषीमंत्री व पक्षाध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळेही उपस्थित होते. पिचड म्हणाले की, खरे तर अजित पवार यांनी माफी मागितल्यानंतर हा विषय संपलाय. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलेले वक्तव्य त्याहीपेक्षा वाईट आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. खासदार सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांना ज्या पद्धतीने लक्ष्य केले जाते, ते फारच दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया दिली. पवारांच्या राजीनाम्यावरून विधिमंडळाचे कामकाज ठप्प झाले असून हा पेच कसा सोडवणार? या प्रश्नावर सुळे म्हणाल्या की, हा पक्षाचा अंतर्गत मामला आहे. विधानसभा अध्यक्षांच्या आपला विश्वास असून ते याबाबत निर्णय घेण्यास कार्यक्षम असल्याचे त्या म्हणाल्या.

पवारविरोधी दाव्यावर 29 एप्रिलला निर्णय
बेताल वक्तव्याबाबत अजित पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जनशक्तीचे अध्यक्ष हेमंत पाटील यांनी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात खासगी दावा दाखल केला आहे. याबाबत पुढील सुनावणी 29 एप्रिल रोजी होणार आहे. याचिकाकर्ता पाटील म्हणाले, पवार यांनी दुष्काळग्रस्तांची अवहेलना केली आहे. त्यांच्यावर कलम 506, 507 नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा यासाठी हा खासगी दावा दाखल करण्यात आला आहे.

शरद पवारांचे मौन आज सुटणार ?
अजित पवार यांच्या बेताल वक्तव्याबाबत ट्विटरवरून माफी मागणारे पक्षाध्यक्ष शरद पवार आठवडाभर याविषयावर मौन साधून आहेत. शुक्रवारी दिवसभर मुंबईत असूनही त्यांनी याविषयावर पत्रकारांशी बोलणे टाळले. शनिवारी ठाण्यात त्यांच्या उपस्थितीत पक्षाचा कार्यक्रम असून त्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. यावेळी ते आपले मौन सोडतील, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुख्यमंत्री चव्हाण यांची शरद पवारांशी चर्चा
शरद पवार व मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यात शुक्रवारी राज्यातील एसटी कामगारांचे प्रश्न तसेच प्राध्यापकांच्या संपाबाबत सह्याद्री अतिथीगृहात चर्चा झाल्याचे मुख्यमंत्री कार्यालयातून सांगण्यात आले. उभय नेत्यांमध्ये सुमारे एक तास बंदद्वार चर्चा झाली. राज्यातील दुष्काळी स्थितीचा पवारांनी या वेळी आढावा घेतला तर उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबतही दोघांत चर्चा झाल्याचे समजते.