आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • No Toll Free Mumbai, Three Months Extension Chandrakant Patil

मुंबईला टोलमुक्ती नाहीच, तीन महिन्यांची मुदतवाढ - चंद्रकांत पाटील यांचे स्पष्टीकरण

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - युती सरकारने मुंबईकरांना दाखवलेले टोलमुक्तीचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी आणखी काही महिन्यांची वाट पाहावी लागणार आहे. मुंबई शहरात प्रवेश करणा-या पाच टोल नाक्यांमधून सवलत देण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीला राज्य सरकारने तीन महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. या समितीने अहवाल सादर केल्यानंतर सरकार निर्णय घेईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली. मुंबईतील पाच टोलनाक्यांसंदर्भात निर्णय घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती िनयुक्त केली होती. आर्थिक व कायदेशीर बाजूंचा अभ्यास करून ही समिती जुलैअखेर अहवाल सादर करेल, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबईच्या टोलमुक्तीबाबत युती सरकार कोणता निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष होते. परंतु, या समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ देत चंद्रकांत पाटील यांनी मुंबईकरांना िनराशेचा धक्का दिला.

मुंबईत प्रवेश करणा-या पाच टोल नाक्यांमधून मुंबईकरांना सवलत देण्याच्या मुद्द्यावर राज्य सरकार ठाम आहे, पण, त्याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव आनंद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेल्या समितीला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्याचा निर्णय़ घेण्यात आला आहे, असे पाटील यांनी सांगितले.

जूनपासून राज्यातील जीप, कार व एसटी बसला ५३ टोलनाक्यांवरील टोलमधून वगळण्यात आले आहे. याशिवाय १२ टोलनाके पूर्ण बंद करण्यात आले आहेत. या निर्णयामुळे तेथील कंत्राटदारांना देण्यासाठी आठशे कोटी रुपये आपण पुरवणी मागण्यांच्या माध्यमातून मंजूर करून घेतलेले आहेत. पण मुंबईतील टोलनाके बंद केल्यानंतर अथवा फक्त लहान वाहनांना टोलमधून सवलत देण्यात आल्यानंतर कंत्राटदाराला जी रक्कम देय राहील ती फारच मोठी होईल. त्यामुळे मोठ्या वाहनांना अधिक काळ टोल लावून लहान वाहनांना सवलत देण्याबाबतची गुंतागुंतीची आकडेमोड करून अधिक स्पष्ट प्रस्ताव यावा यासाठी समितीला मुदतवाढ देण्यात आली आहे, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

पुढे वाचा... आणखी १८ टोल नाक्यांवर सवलतीसाठी केंद्राला विनंती