आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालक लैंगिक शोषणाविरोधात भारत यात्रेला कॉर्पोरेटचा पाठिंबा, कैलाश सत्यार्थींचा पुढाकार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बालकांचे लैंगिक शोषण आणि त्यांची विक्री या कुप्रथांचे समूळ उच्चाटन व्हावे यासाठी नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थी यांनी सुरू केलेल्या भारत यात्रा मोहिमेला बाॅम्बे स्टाॅक एक्स्चेंज, पेटीएम, गोदरेज आणि एल अँड टी या कॉर्पोरेट कंपन्यांनी पाठिंबा दर्शवला.  
 
बॉम्बे स्टाॅक एक्स्चेंजने (बीएसई) गुरुवारी कैलाश सत्यार्थी यांना मुंबईत पाचारण केले होते. या वेळी गोदरेज कन्झ्युमर प्राॅडक्टचे व्यवस्थापकीय संचालक विवेक गंभीर, एल अँड टी रिअॅलिटीचे सीईओ श्रीकांत जोशी आणि अभिनेता विवेक ओबेराॅय उपस्थित होते. सत्यार्थी यांच्यासोबत यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन या सर्वांनी केले. भारत यात्रेचे आयोजन केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टि्वटरच्या माध्यमातून कैलाश सत्यार्थी यांचे अभिनंदन केले. बाललैंगिक शोषणाविरोधातील या यात्रेचे महाराष्ट्र मनापासून स्वागत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

देशभर फिरणाऱ्या या भारत यात्रेमुळे मुलांचे भविष्य सुरक्षित होण्यास मदत होईल, असे स्पष्ट करत नागरिकांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी सत्यार्थी यांनी काढलेल्या भारत यात्रेेला बॉम्बे स्टाॅक एक्स्चेंजचा  पूर्ण पाठिंबा असल्याचे बीएसईचे सीईओ आशिषकुमार चौहान यांनी सांगितले. कॉर्पोरेट्सनी आपली सक्षमता, प्रभाव आणि तंत्र वापरून कौशल्यपूर्ण भारताप्रमाणेच सुरक्षित भारत करण्यावरही भर दिला पाहिजे. आपल्या मुलांची निरागसता, स्वातंत्र्य आणि हास्य यावर होणाऱ्या बलात्काराविरुद्ध मी युद्ध पुकारले आहे. बाललैंगिक हिंसा व विक्रीविरोधात पुकारलेली भारत यात्रा मोहीम नाही तर युद्ध आहे, असे कैलाश सत्यार्थी म्हणाले.
 
मुलांचे स्वातंत्र्य, संरक्षण आणि सुरक्षा याबद्दल कैलाश सत्यार्थी गेली ३६ वर्षे जगभरात मोहीम राबवत आहेत. १९९८ मध्ये त्यांनी जागतिक मोर्चा काढला होता. २०११ मध्ये त्यांनी शिक्षण यात्रा काढली होती. बालहक्काच्या बाबतीत त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल २०१४ मध्ये त्यांना नोबेल पुरस्काराने गौरवण्यात आले.  ११ सप्टेंबर रोजी विवेकानंदांच्या स्मारकापासून ही भारत यात्रा सुरू होणार असल्याची माहिती त्यांनी या वेळी दिली.
बातम्या आणखी आहेत...