आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कायम विनाअनुदानित शाळांचे चांगभले, राज्यातल्या 246 खासगी शाळांना अनुदान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 2001 मध्ये ‘कायम’ विनाअनुदान तत्त्वावर सुरू करण्यास परवानगी दिलेल्या खासगी प्राथमिक व माध्यमिकच्या 246 शाळांचा ‘कायम’ शब्द वगळून अनुदानावर घेण्याचा निर्णय राज्य शासनाने शुक्रवारी घेतला. यातील 144 शाळा एकट्या औरंगाबाद जिल्हय़ातील असून शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी मराठवाड्याला झुकते माप दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

24 नोव्हेंबर 2001 रोजी प्राथमिक आणि माध्यमिकच्या प्रत्येकी 2000 शाळांना (बिगर इंग्रजी) ‘कायम’ विनाअनुदान तत्वावर परवानगी दिली होती. परंतु, त्यानंतर कायम शब्द वगळण्याची सातत्याने मागणी होत होती. मूल्यांकनाचे निकष पूर्ण करणार्‍या शाळांचा ‘कायम’ शब्द वगळण्याचा निर्णय 20 जुलै 2009 रोजी झाला होता.

त्यानुसार मूल्यांकनाचे सुधारित निकष जाहीर करण्यात आले होते. त्या निकषांची पूर्तता करणार्‍या 530 शाळांना अनुदान चालू करण्यात आले. शुक्रवारी पुन्हा त्यातील 246 शाळांना अनुदानावर घेण्यात आले आहे. त्यामुळे कायम शब्द वगळण्यात आलेल्या राज्यातील एकूण शाळांची संख्या आता 774 पोचली आहे.

पात्र ठरलेल्या शाळांना 2013-14 या शैक्षणिक वर्षापासून 20% अनुदान चालू होईल. दरवर्षी त्यामध्ये 20% वाढ होणार आहे. त्यामुळे या 246 शाळा यंदापासून 40%अनुदानास पात्र ठरणार आहेत.
लाभ कोणाला?2 कायम शब्द वगळल्याचा लाभ 246 शाळा, त्यातील 711 तुकड्या आणि 1818 पदांना होणार आहे. या शाळांना प्रतीवर्षी 20%च्या पटीत वाढीव अनुदान मिळणार आहे.

औरंगाबादला फायदा
शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा औरंगाबादचे आहेत. त्यामुळे ‘कायम’ शब्द वगळण्यात आलेल्या शाळा या प्रामुख्याने मराठवाड्यातील विशेषत: औरंगाबाद जिल्ह्यातील(144) आहेत, असा संस्थाचालकांचा आरोप आहे.

मराठवाड्याला लाभ
कायम शब्द वगळण्यात आलेल्या 246 एकूण शाळांपैकी मराठवाड्यातील 144, उत्तर महाराष्ट्रातील 94, विदर्भातील 5 तर 3 शाळा मुंबईतील 3 विनाअनुदानित शाळांचा समावेश करण्यात आला आहे.