आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईतील अमराठी मतदार अामचेच; शिवसेनेसह भाजप नेत्यांचाही छातीठाेक दावा! (महाकाैल)

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत मराठी मतदारांबरोबरच अमराठी मतदारांवरही सर्वच राजकीय पक्षांचा डोळा आहे.  उत्तर भारतीय, गुजराती अाणि दक्षिण भारतीय मतदारांनाही अाकर्षित करण्यासाठी सर्वच पक्ष सरसावलेले दिसतात. यात भाजप अाघाडीवर अाहे. शिवसेनेनेही गुजराती मतदारांवरच लक्ष केंद्रित केले असून भाजपने मात्र गुजराती मते गृहीत धरून उत्तर भारतीय आणि दक्षिण भारतीय मतदारांकडे जास्त लक्ष ठेवले आहे.
 
सन २०१२ च्या निवडणुकीच्या वेळी उत्तर भारतीय मतदार विधानसभा निवडणुकीसाठी त्यांच्या राज्यात गेलेला असल्यामुळे  त्यांच्या मतदानाची टक्केवारी घसरली होती. मात्र या वेळी हा मतदार मुंबईतच असल्याने मतदान टक्केवारी वाढण्याची अाशा अाहे.  

मुंबईत ४० लाख उत्तर भारतीय आहेत. मतांच्या टक्केवारीत हे प्रमाण सुमारे २० टक्के आहे. उत्तर भारतीयांची मते मिळावीत म्हणून भाजपने गेल्या वर्षी आर. एन. सिंह यांना अामदारकी दिली. भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले, यंदाही उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका आहेत. १९ आणि २३ फेब्रुवारी रोजी निवडणुकीचा चौथा आणि पाचवा टप्पा असला तरी ज्या १२ जिल्ह्यांमध्ये या निवडणुका आहेत त्यापैकी फार कमी जिल्ह्यांतील नागरिक मुंबईत आहेत.
 
१९ फेब्रुवारी राेजी लखनऊ आणि बाराबंकीत, तर २३ फेब्रुवारी राेजी प्रतापगड, अलाहाबाद, बांदा आणि रायबरेली या जिल्ह्यांतील मतदान हाेणार अाहे. मात्र मूळ तेथील रहिवासी उत्तर भारतीयच मुंबईत आहेत. तसेच निवडणूक अायाेगाने अाता दुबार मतदारांची नावे वगळल्यामुळे येथे स्थानिक झालेल्या उत्तर भारतीयांनी मुंबईतच नावे कायम ठेवली अाहेत. त्यामुळे यंदा या मतदारांचे प्रमाण वाढू शकते.’  

मुंबईत तामिळ, तेलगू, मल्याळम, कन्नड भाषिक मतदारांची संख्या २० लाखांच्या आसपास आहे. दक्षिण भारतीय मतदारांच्या पाठिंब्यानेच भाजपचे कॅप्टन तमिल सेल्वन विधानसभेच्या निवडणुकीत जिंकले होते. हे मतदार पुन्हा साथ देतील. यासोबतच गुजराती, जैन, मारवाडी मतदारांची संख्या १५ ते १७ लाख आहे. हार्दिक पटेल यांना जरी शिवसेनेने बरोबर घेतले असले तरी ही मतेही आमच्याकडेच वळतील, असा विश्वास भाजप नेते व्यक्त करीत आहेत.   

शिवसेना अामदार अनिल परब यांना अमराठी मतांबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘मतदारांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील विश्वास उडाला आहे. त्यामुळे भाजप काय म्हणत आहे त्याकडे लक्ष देण्याची आवश्यकता वाटत नाही. फक्त मराठी मतदारच नव्हे, तर अमराठी मतदारही आमच्यासोबत असल्याने आमचाच महापौर हाेणार यात शंका नाही.’   

भाजपमधून शिवसेनेत आलेल्या या व्यावसायिकाने सांगितले की, ‘केंद्रात, राज्यात भाजप असला तरी मुंबईत आम्हाला शिवसेना हवी. याचे कारण एवढेच की काहीही झाले की आम्ही शाखाप्रमुखाकडे जातो आणि तो मग मराठी-अमराठी असा विचार न करता अामच्या मदतीला धावून येताे.’  मुंबईतील मराठी व अमराठी मतदारही भाजपसोबत असून आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि आमचा महापौर होईल, असा दावा भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी केला. नरेंद्र मोदींमुळे उत्तर भारतीयांसोबत दक्षिण भारतीय मतदारही भाजपकडेच येत आहेत. मराठी मतदारही आमच्यासोबतच आहेत. शिवसेना आणि मनसेही मैदानात असल्याने मराठी मतांचे विभाजन होणार असून त्याचा आम्हालाच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.  
बातम्या आणखी आहेत...