आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिनकामाच्या योजना सरकार करणार बंद, १ हजार २६० योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याच्या सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गेल्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद केलेल्या राज्य सरकारच्या विविध विभागांच्या तब्बल १२६० योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याचे आदेश वित्त विभागाने दिले आहेत. येत्या जून महिन्यापर्यंत सर्व विभागांनी आपापल्या योजनांचे पुनर्मूल्यांकन करून त्याबाबतचा विस्तृत अहवाल पाठवण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. या अहवालांच्या आधारे मागील सरकारने लागू केलेल्या ज्या योजनांचा फायदा अपेक्षित लाभार्थींपर्यंत पोहोचत नाही त्या योजना येत्या आर्थिक वर्षांत बंद करण्याचा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे.

राज्याची खालावलेली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता आगामी अर्थसंकल्प सादर करण्याचे मोठे आव्हान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्यासमोर असणार आहे. या पार्श्वभूमीवर वित्त विभागाने आर्थिक आघाडीवर तूट कमी करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबींवर काम करायला सुरुवात केली आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून राज्य सरकारच्या वतीने विविध विभागांमार्फत राबवल्या जाणा-या योजनांना कात्री लावण्याचे ठरवले आहे. राज्य सरकारच्या वतीने कामगार, महिला, बालके, अनाथ, अपंग, आदिवासी, आर्थिकदृष्ट्या मागास समाजघटक अशा विविध सामाजिक घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यासाठी सरकार अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूदसुद्धा करत असते. सध्या अशा तब्बल १२६० योजना राज्यात राबवल्या जात असून गेल्या अर्थसंकल्पात मागील सरकारने त्यासाठी आर्थिक तरतुदीही करून ठेवल्या होत्या. मात्र, यापैकी अनेक योजनांचा निधी विनावापर तसाच पडून असल्याची बाब समोर आली आहे. शिवाय अनेक योजना ख-या लाभार्थींपर्यंत पोहोचतच नाहीत. त्यामुळे एकीकडे राज्याची आर्थिक स्थिती खालावलेली असताना नव्याने कर्ज काढून नव्या अर्थसंकल्पात अशा योजनांसाठी निधी उपलब्ध करून देण्याऐवजी या योजना बंद कराव्यात, असा निर्णय वित्त विभागाने घेतला आहे.

पुनर्मूल्यांकन कसे?
राज्य सरकारच्या वतीने विविध खात्यांमार्फत राबवण्यात येणा-या कल्याणकारी योजना असल्याने त्या काही विशिष्ट समाज घटकांना नजरेसमोर ठेवून राबवल्या जातात. त्या बंद केल्यास नेमका काय परिणाम त्या विशिष्ट समाज घटकांवर होणार याचा लेखाजोखा या पुनर्मूल्यांकनामध्ये होणे अपेक्षित आहे.

बंद योजनांची यादी पावसाळी अधिवेशनात जाहीर करु : अर्थमंत्री
सध्या आम्ही गेल्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या अशा योजनांचे पुनर्मूल्यांकन करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. यंदाचा अर्थसंकल्प सादर केल्यानंतर मी त्या पुनर्मूल्यांकन अहवालाचा आढावा घेऊन कोणत्या योजना सुरू राहणार आणि कोणत्या बंद होणार याबाबतचा निर्णय येत्या पावसाळी अधिवेशनात जाहीर करेन, अशी माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.