मुंबई- यंदा महाराष्ट्रासह देशात सरासरीपेक्षा 60 टक्के कमी पाऊस पडणार असल्याचे 'स्कायमेटवेदर'ने म्हटले आहे. त्यामुळे देशभर सर्वत्र दुष्काळाची छाया राहणार असल्याचा अंदाज स्कायमेटने वर्तविला आहे. उत्तरेकडे दुष्काळ पडण्याची 80 टक्के शक्यता आहे तर मध्य भारतात 60 टक्के शक्यता आहे. दक्षिण भारतात 50 टक्के दुष्काळ पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, 2009 सारखी भीषण परिस्थिती उद्भवणार नाही असे स्कायमेटचे म्हणणे आहे.
यंदा जून ओलांडला तरी पावसाने देशात बहुतांश भागात अद्याप हजेरी लावलेली नाही. दरवर्षी जून महिन्यांत दक्षिण भारतात चांगला पाऊस होतो. मात्र अद्याप तेथे पाऊस पडलेला नाही. गेल्या दोन दिवसापासून मुंबईत पाऊस पडलेला आहे. मात्र त्याचा जोर कमी झाला आहे. याचबरोबर उर्वरित महाराष्ट्राकडे पाऊस सरकलेला नाही. विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, मध्ये महाराष्ट्र अद्याप कोरडा आहे. विशेष म्हणजे किती पाऊस कमी पडला तरी कोकणात जोरदार पाऊस होतो. मात्र यंदा कोकणातही विशेष पाऊस पडलेला नाही. यावरून संभाव्य भीषण दुष्काळाची कल्पना करता येऊ शकते.
दरम्यान, जुलैच्या मध्यात महाराष्ट्रासह देशभर पाऊस पडण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे. मात्र, सरासरीपेक्षा तो कमी राहील अशी भीतीही व्यक्त केली आहे. एकून भारतासह दक्षिण आशिया खंडावर एल-निनोचा मोठा परिणाम होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.