Home »Maharashtra »Mumbai» Not Come In Mumbai,I Fear Date

मुंबईत येणार नाही; मला मरणाची भीती

वृत्तसंस्था | Jan 10, 2013, 05:36 AM IST

  • मुंबईत येणार नाही; मला मरणाची भीती

मुंबई - 26/11 हल्ल्याचा सूत्रधार अबू जुंदाल ऊर्फ जबीउद्दीन अन्सारी हा 1996 पासून देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याची माहिती महाराष्‍ट्र एटीएसच्या वतीने बुधवारी विशेष मोक्का न्यायालयास देण्यात आली. दरम्यान, ‘जर्मन बेकरी स्फोटातील आरोपी कातिल सिद्दिकीप्रमाणे आपलाही तुरुंगातच ‘गेम’ होईल, म्हणून आपण मुंबईत येणार नाही,’ अशी भीती जबीने आपल्या वकिलाजवळ बोलून दाखवली आहे.

जबी सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात आहे. औरंगाबादजवळ 9 मे 2006 रोजी पकडण्यात आलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणी त्याच्यावर एटीएसने आरोपपत्र दाखल केले आहे. बुधवारी जबीने तिहार जेलमधून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे याप्रकरणाच्या सुनावणीत हजेरी लावली. ‘2006 मध्ये सापडलेल्या शस्त्रसाठ्याप्रकरणात जबीचे दहशवाद्यांचे संबंध असल्याचे उघडकीस आले असले तरी तो 1996 पासूनच देशातील व देशाबाहेरील दहशवाद्यांशी संपर्कात राहून देशविघातक कारवाया करत होता,’ असे पोलिसांनी दिलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आले आहे.

आरोपपत्र फॅक्सद्वारे
आरोपपत्र फॅक्सद्वारे तिहारच्या तुरुंगात पाठवण्यात आले आहे. ते वाचून जबी त्यावर सही करून पाठवणार असल्याचे अ‍ॅड. इयाज नक्वी यांनी कोर्टात सांगितले.

मुंबईत आणणार नाही
प्रजासत्ताक दिनाच्या तयारीत पोलिस गुंतले असल्याने व जादा पोलिस बळ नसल्याने जबीला मुंबईत आणले जाणार नसल्याचे सरकारी वकिलांनी न्यायमूर्ती एस. एम. मोडक यांना सांगितले, तर ‘जबी स्वत:ही मुंबईत येण्यास उत्सुक नसून सिद्दिकीप्रमाणे आपलाही खात्मा होण्याची त्याला भीती वाटत आहे,’ असे त्याचे वकील इयाज नक्वी यांनी कोर्टात सांगितले.

काय आहे प्रकरण?
9 मे 2006 रोजी औरंगाबाद जिल्ह्यातील वेरूळजवळ शस्त्रसाठा असलेल्या दोन गाड्या जप्त करण्यात करून तिघांना अटक केली होती. या गाड्यांमधून 30 किलो आरडीएक्स, 10 एके 47 रायफल्स, 3200 बुलेट्स जप्त करण्यात आल्या होत्या. मात्र, जबी पोलिसांच्या डोळ्यांत धूळ फेकून तो मालेगावात व नंतर थेट बांगलादेशात पळून गेला होता, असे एटीएसचे म्हणणे आहे.

Next Article

Recommended