आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Election Rally Of Modi And Shah In Mumbai Thane, Divya Marathi

मुंबई-ठाण्यात भाजपला नको मोदी-शहांची सभा, ‘गुजराती विरुद्ध मराठी’ प्रचाराची धास्ती

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - महायुती तुटल्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आघाडी सोडून आता आपला जुना मित्रपक्ष भाजपलाच निशाण्यावर घेतले आहे. मुंबई आणि ठाण्यात शिवसेनेने "मराठी विरुद्ध गुजराती' असा प्रचार सुरू केल्याने भाजपच्या मराठी उमेदवारांमध्ये धडकी भरली आहे. शिवाय मनसेचाही मराठी अस्मिता हाच प्रचाराचा मुख्य मुद्दा आहे. त्यामुळे मराठी मते दुरावण्याच्या भीतीने या उमेदवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या सभा नकोत, असा सूर आळवायला सुरुवात केली आहे.

कालपर्यंत देशात मोदींची लाट आहे, असा दावा भाजपकडून केला जात आहे. त्यांच्या जास्तीत जास्त सभा व्हाव्यात असा आग्रहही केला जात आहे. मात्र, मुंबईतील भाजप उमेदवारांची परिस्थिती वेगळी आहे. िशवसेनेने सोशल मीडिया आणि मतदारांशी भेटीच्या माध्यमातून सुरू केलेला गुजराती विरुद्ध मराठी प्रचार हे याचे कारण आहे. त्यातही भाजपला मत म्हणजे थेट "मराठी विरोधी मत' असा रंग या प्रचाराला चढल्याने मराठी मते दुरावण्याची चिंता भाजपच्या उमेदवारांना सतावते आहे. त्यातच जर मोदी आणि शहांच्या सभा आपल्या मतदारसंघात झाल्या, तर या प्रचाराला आणखी धार चढेल आणि आगीत आयतेच तेल अोतले जाईल, अशी भीती मुंबईतल्या आणि ठाण्यातल्या भाजप उमेदवारांना वाटते आहे. यासाठी मुंबई आणि ठाण्यातील मतदारसंघात मोदींच्या सभा होणार नाहीत, यासाठी भाजप उमेदवार प्रयत्नशील आहेत.

महाराष्ट्रातील एकूण २८८ मतदारसंघापैकी मुंबईत ३६ आणि ठाणे परिसरात २४ असे एकूण ६० मतदारसंघ आहेत. या भागात आघाडी घेणा-या पक्षाकडे सत्ता स्थापन करण्याची संधी मिळू शकते, असे जाणकारांना वाटते. त्यामुळे पक्षश्रेष्ठींनी या भागाकडेच अधिक लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई आणि ठाण्यात प्रामुख्याने मराठी, मुस्लिम आणि परप्रांतीय मतदारांच्या एकगठ्ठा मतांवर उमेदवारांचा डोळा असतो. त्यानुसारच उमेदवारांचे भवितव्य आजवर ठरत आले आहे. परप्रांतीय मतदारांमध्ये गुजराती मतांचा मोठा टक्का आहे. त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती असा प्रचार झाल्यास मतांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसू शकतो. ही बाब भाजप उमेदवारांच्या लक्षात आली आहे.

गडकरींची सभा फेल!
प्रचाराचा रंग चढल्याने शिवसेना आणि मनसेकडून सभांना गर्दी खेचण्याचा प्रयत्न केला जातो आहे. हा भाजपसमोर चिंतेचा विषय ठरू शकतो. भाजपचे केंद्रीय नेते नितीन गडकरी यांच्या चिखलीतल्या सभेतही फारसा दम दिसून आला नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे.