आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Not Give Important To The Aap, Its Conspiracy Of Congress For Modi BJP

‘आप’ला जास्त महत्त्व देऊ नका, मोदींना रोखण्‍यासाठीच कॉंग्रेसचा 'आप'ला पाठिंबा - भाजपची सूचना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आम आदमी पार्टीला (आप) उगाचंच महत्त्व देऊ नका. नरेंद्र मोदींची आगेकूच रोखण्यासाठीच ‘आप’ला काँग्रेस पाठिंबा देत आहे. म्हणूनच या नव्या पक्षावर टीका करून त्यांना चर्चेत आणू नका, अशा सूचना भाजपने आपल्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
भाजपचे पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची मुंबईतील रॅली यशस्वी झाल्याबद्दल वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात सोमवारी भाजपातर्फे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी चहापानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे व मुंबई भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी चहापानाच्या निमित्ताने पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे बौद्धिकही घेतल्याचे खास सूत्रांनी सांगितले. त्यांच्या बोलण्याचा बहूतांश रोख अरविंद केजरीवाल यांच्या ‘आप’कडे होता.
काँग्रेसने ‘आप’ला जन्म दिला असून त्यांचे मुख्य लक्ष्य मोदींना रोखण्याचे आहे. त्यामुळे ‘आप’वर टीका टिपण्णी करून, त्यांना अधिक महत्व दिल्यास भाजपाचे नुकसान होऊ शकते. दिल्लीत काँग्रेसच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात रान उठवणा-या ‘आप’ने शेवटी काँग्रेसचाच पाठिंबा घेत सरकार बनवले, हे विसरू नका, असे फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते. तावडे म्हणाले, भाजपाची लढाई काँग्रेसशी आहे. भ्रष्टाचार, दहशत व महागाईमुक्त देश करायचा असेल तर काँग्रेसला सत्तेवरून पायउतार करावेच लागेल आणि हे करताना ‘आप’चे महत्व वाढवून आपले लक्ष्य विचलित करता कामा नये.
‘आम आदमी’चे पुढील टार्गेट महाराष्‍ट्र
दिल्लीतील यशानंतर ‘आप’चे पुढचे टार्गेट महाराष्‍ट्र आहे. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, नाशिक या महत्त्वाच्या शहरांमध्ये ‘आप’चे उमेदवार ठरवण्यासाठी जोरदार चर्चा सुरू आहेत. निवडणुकांसाठी अंजली दमानिया, विजय पांढरे अशी महत्वाची नावे या पक्षाकडून पुढेही आली आहेत. सरळ लढतीत महायुती काँग्रेस-राष्‍ट्रवादी आघाडीवर मात करण्याचे वातावरण निर्माण झाले असताना आता ‘आप’च्या उमेदवारांमुळे मतांची विभागणी होऊन त्याचा महायुतीच्या यशावर परिणाम होऊ शकतो, असे राजकीय तज्ज्ञांना वाटते. कदाचित यामुळेच ‘आप’चे महत्त्व वाढवू नका, असा संदेश भाजप नेत्यांकडून देण्यास सुरुवात झाली आहे.
केजरीवाल यांच्याप्रमाणे पर्रीकरांचीही राहणी साधी
‘आप’चे सरकार आल्यानंतर लोकांमध्ये केजरीवाल किती साधे राहतात, याची चर्चा होते. मात्र, गोव्यातील भाजपचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे सुद्धा आयआयटीन्स असून त्यांचे राहणीमानही अत्यंत साधे आहे. त्यांनी गोव्याला काँग्रेसच्या भ्रष्टाचारपासून मुक्त केले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पर्रीकरांचे महत्त्व लोकांना पटवून द्यायला हवे, अशा सूचनाही भाजप नेत्यांनी केल्या.
गडकरींच्या सूचनांची देशभर अंमलबजावणी
भाजपचे ज्येष्ठ नेते व माजी राष्‍ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी आम आदमी पक्षाचे महत्त्व वाढवू नका, असा आधीच सल्ला देशभरातील भाजप कार्यकर्त्यांना दिला होता. तोच कित्ता भाजपच्या राज्यातील नेत्यांनी गिरवल्याचे सूत्रांनी सांगितले. फक्त महाराष्‍ट्रच नव्हे तर सर्व राज्यांतील भाजपच्या पदाधिका-यांपर्यंत ‘आप’बाबतीत याच सूचना देण्यात आल्या आहेत.
भाजपने दिल्लीत सरकार बनवावे : शिवसेना
आम आदमी पार्टीने दिल्लीत अल्पमतातही सरकार स्थापन केले आहे. या पार्श्वभूमीवर भाजपनेदेखील अल्पमतातील सरकार स्थापण्यासाठी प्रयत्न करावेत, असा सल्ला मित्रपक्ष शिवसेनेने सोमवारी ‘सामना’च्या अग्रलेखातून दिला. दिल्लीत भाजपला 32 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे त्यांना अल्पमतातील सरकार बनवणे शक्य आहे. उठसूट इतरांना भ्रष्टाचारी ठरवून स्वत:ची कार्यक्षमता सिद्ध होत नाही. आज ‘आप’चे अरविंद केजरीवाल ज्या पद्धतीने चालत-बोलत आहेत तसेच काही वर्षांपूर्वी लालूप्रसाद यादवही बोलत होते. मात्र, कालांतराने त्याच लालूंना भ्रष्टाचारामुळे तुरुंगात जावे लागले, याकडेही शिवसेनेच्या वतीने लक्ष वेधण्यात आले.