आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माफी नको, तुरुंगवास भोगेन : संजय दत्त

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - ‘शिक्षेविरुद्ध अपील करणार नाही. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या मुदतीत आत्मसमर्पण करीन...’ हे सांगताना पत्रकार परिषदेत संजय दत्त गुरुवारी भावूक झाला. त्याला अश्रू आवरले नाहीत. बहीण प्रिया दत्तच्या खांद्यावर डोके ठेवून त्याने अश्रूंना वाट मोकळी करून दिली. बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने त्याला 5 वर्षांची शिक्षा सुनावली होती.
प्रथमच माध्यमांशी बोलताना संजय म्हणाला, कोर्टाच्या निकालाचा सन्मान करतो. देश, देशबांधवांबद्दल मनात प्रेम आहे. माफीसाठी अपील करणार नाही. यावरील चर्चा आता बंद व्हावी, अशी हात जोडून विनंती आहे. मला शांततेत जगायचे आहे. कुटुंबीयांसोबत वेळ घालवायचा आहे. चित्रपट पूर्ण करायचे आहेत. आमच्यासाठी हा काळ कसोटीचा आहे. मी मनाने पुरता कोसळलो आहे.

या कठीण काळात ज्यांनी साथ दिली त्यांचे मी मनस्वी आभार मानतो,’ अशा शब्दांत त्याने ऋण व्यक्त केले.
दखल देणार नाही : काँग्रेस
संजय दत्तला माफी देण्याबाबत कायदेशीर बाबींमध्ये काँग्रेस दखल देणार नाही, असे पक्षप्रवक्ते रशीद अल्वी यांनी म्हटले आहे. कोर्टाच्या निकालाचा आम्ही सन्मान करू, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजपचे बलबीर पूंज यांनीही संजयच्या माफीचा मुद्दा बाजूला सारून एक सजग नागरिक म्हणून त्याने कोर्टाच्या निकालाचा सन्मान करावा, असे आवाहन केले.

18 एप्रिल मुदत
संजयला आत्मसमर्पणासाठी सुप्रीम कोर्टाने 18 एप्रिलची मुदत दिली आहे. त्याने पूर्वी सुमारे दीड वर्ष तुरुंगवास भोगला आहे. आता साडेतीन वर्षे त्याला तुरुंगात घालवावी लागणार आहेत.

250 कोटींची धास्ती
संजय आत्मसमर्पण करण्यापूर्वी चित्रपट पूर्ण करणार आहे. ‘पुलिसगिरी’सह त्याचे अनेक चित्रपट अर्धवट आहेत. विविध निर्मात्यांनी त्यावर 250 कोटी रुपये लावले आहेत.

काटजू यांचे अपील
प्रेस कौन्सिलचे चेअरमन न्या. मार्कंडेय काटजू यांनी संजयला माफी देण्यात यावी म्हणून राज्यपाल व राष्‍ट्रपतींना पत्र लिहिले आहे. माफीसाठी कोणी अपील करावे याचा घटनेत उल्लेख नाही, असे ते म्हणतात.

निर्मात्यांना आशा
‘पुलिसगिरी’चे निर्माते टी. पी. अग्रवाल म्हणाले, ‘ काही अ‍ॅक्शन दृश्य शिल्लक आहेत. आठ-दहा दिवसांत संजयहे काम पूर्ण करू शकेल.’ ‘घनचक्कर’चे निर्माते राजकुमार गुप्ता यांनाही चित्रपटाविषयी आशा आहेत.
संजय एक कसलेला अभिनेता आणि मोठ्या मनाचा कलाकार आहे, असे गुप्ता यांनी म्हटले आहे.