आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - राज्यातील प्रत्येक छोट्या- मोठ्या मुद्द्यावरून एकमेकांना अडचणीत आणण्याची एकही संधी न सोडणा-या सत्ताधारी कॉँग्रेस- राष्ट्रवादीत दुष्काळाच्या मुद्द्यावरूनही धुसफूस सुरू झाली आहे. ‘राज्यातील परिस्थिती गंभीर असून, दुष्काळ निवारणाबाबत कुणाच्या काही सूचना असतील तर त्यांनी सरकारला सादर कराव्यात. मात्र, सवंग प्रसिद्धीसाठी दुष्काळाचा वापर करू नये’, असा टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सोमवारी राष्ट्रवादीच्या नेत्यांना लगावला.
दुष्काळाबाबत काही पक्ष आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत, तर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दुष्काळ निधी जमवण्यास सुरुवात केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा सल्ला दिला आहे. तसेच राज्यातील दुष्काळाबाबत केंद्राकडे पाठपुरावा करून अधिक मदत निधी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील विशेषत: मराठवाड्यातील चार जिल्हे आणि पश्चिम महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांमध्ये अतिशय भीषण परिस्थिती आहे. त्याबाबत आपण आणि उपमुख्यमंत्र्यांसह ज्येष्ठ मंत्री दौरा करीत आहेत. या दौ-या नंतर सर्व माहितीचा आढावा घेऊन दुष्काळाबाबत उपाययोजना करण्यात येणार येतील. दुष्काळी भागातील चारा छावण्यांमध्ये मोठ्या जनावरांसाठी 35 रुपये असलेला निधी वाढवून द्यावा, सिंचनाच्या प्रकल्पांसाठीही निधी द्यावा, राज्यातील पूर्णत्वास आलेल्या प्रकल्पांसाठी एआयबीपीतून निधी देण्यात यावा, अशा मागण्या केंद्राकडे केली असून रब्बीच्या पैसेवारीसाठी पथक पाठवण्यात यावे, अशी मागणी 15 दिवसांपूर्वी शरद पवार यांच्याकडे केल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा भर ‘व्हीसी’वर
उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद जिल्ह्यात मुख्यमंत्र्यांचा 12 फेब्रुवारीला दौरा जाहीर झाला; पण तोपर्यंत शरद पवार, उद्धव, राज ठाकरे यांनी आधीच आपले दौरे सुरू केले. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत मुख्यमंत्र्यांच्या दौ-या बाबत अनिश्चितता होती. त्यांनी फक्त व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आढावा घेण्यावर भर दिला.
सूचना सरकारकडे द्या
काही पक्षांच्या माध्यमातून दुष्काळाच्या उपाययोजनांसाठी आंदोलने केली जात असल्याबाबत विचारताच मुख्यमंत्री म्हणाले की, दुष्काळाबाबत राज्य सरकार गंभीर असून पर्याप्त उपाययोजना केल्या जात आहेत. तरीही कुणाच्या काही सूचना असतील तर त्यांनी सरकारकडे सादर कराव्यात. मात्र, दुष्काळाचे राजकारण करून सवंग प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करू नये.
मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये दुष्काळाची भीषण परिस्थिती असल्याची सरकारदरबारी नोंद
वेतनाबाबत सकारात्मक आर. आर. पाटील यांनी मंत्रिमंडळ बैठकीत दुष्काळी भागात निधी मिळत नसल्याचा आरोप करून विविध संघटना आणि उद्योगपतींमार्फत निधी जमवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी त्यांना टोला लगावला आहे. तसेच मंत्री आणि आमदारांचा एक महिन्याचा पगार देण्याबाबत सरकार सकारात्मक असून लवकरच निर्णय घेणार असल्याचे चव्हाण म्हणाले.
मुख्यमंत्र्यांची सूचनाच नाही
राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसचे मंत्रीही प्रयत्न करू शकतात. मात्र, मुख्यमंत्र्यांनी एकत्रितपणे काँग्रेसच्या मंत्र्यांनी काय करावे, याची सूचना दिलेली नाही, असे पश्चिम महाराष्ट्रातील एका कॅबिनेट मंत्र्याने सांगितले. मदत व पुनर्वसन, कृषी, महसूल, सहकार ही महत्त्वाची खाती पक्षाकडे आहेत. त्यामध्ये फी माफी, कर्जाची मुदत वाढवणे, वीज बिलात सवलत असे काही निर्णयही सरकारने घेतले आहेत; पण अनेक खात्यांनी त्याच्या अंमलबजावणीसाठी साधे परिपत्रकही काढलेले नाही.
मंत्री नसीम खान यांचीही मदत
गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यानंतर अल्पसंख्याक मंत्री नसीम खान आणि काँग्रेसच्या मुंबईतील आमदारांनीही एक महिन्याचा पगार दुष्काळग्रस्तांना जाहीर केला. काँग्रेस आमदार अमीन पटेल यांनी पुढाकार घेऊन मुंबईतील आमदार मधू चव्हाण, बाबा सिद्दिकी, अस्लम शेख यांच्याशी चर्चा करून सर्वांनी आपला पगार, भत्ते दुष्काग्रस्तांना देण्याचे ठरवले. या निधीसाठी हातभार लावायला सांगणार असल्याचे अमीन पटेल यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.