आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शोभा डे यांना नोटीस, हक्कभंग प्रस्तावावर खुलासा करण्याचे आदेश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - मराठी माणसांविरोधात टिप्पणी केल्याचा आरोप करत शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत दाखल केलेल्या हक्कभंग प्रस्तावावर उत्तर देण्याबाबत विधानसभा सचिव अनंत कळसे यांनी प्रसिद्ध लेखिका शोभा डे यांना नोटीस बजावली आहे. या हक्कभंग प्रस्तावातील आरोपांवर आपली बाजू मांडण्यासाठी डे यांना सात दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे.

मराठी चित्रपटांना प्राइम टाइम देण्याबाबतच्या सक्तीची घोषणा राज्य सरकारने विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती. शालेय शिक्षण आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडेंच्या घोषणेनंतर लगेचच लेखिका शोभा डे यांनी ट्विटरच्या माध्यमातून या निर्णयाला विराेध केला होता. डे यांनी केलेली टिप्पणी मराठीद्वेषी असल्याचा आरोप करत शिवसेनेने त्यांची मते म्हणजे विधिमंडळाच्या कायदे करण्याच्या हक्कावर अाणलेला घाला असल्याची भूमिका मांडली होती.
शोभा डे यांच्या टिप्पणी विरोधात शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. हा प्रस्ताव दाखल करून घेत अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी तो हक्कभंग समितीकडे पाठवला होता. त्यानुसार आता डे यांना आपली बाजू मांडण्याबाबतची नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आमदार प्रताप सरनाईक म्हणाले की, शाेभा डे यांनी दिलगिरी व्यक्त न करता वादग्रस्त भूमिका घेतली तर विधिमंडळाने लोकप्रतिनिधींना दिलेल्या हक्कांच्या माध्यमातून शिवसेना अधिक आक्रमक भूमिका घेणार आहे.