आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संविधान दिन ही सर्वोच्च कामगिरी - ई. झेड खोब्रागडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - उपजिल्हाधिकारी ते सामाजिक न्याय विभागाचा संचालक अशा अनेक पदांवर काम करताना मी बऱ्याच नावीन्यपूर्ण कल्पना राबवल्या; पण नागपूर जिल्हा परिषदेचा ‘सीईओ’ असताना सर्व शिक्षा अभियानांतर्गत ‘संविधान दिन’चा प्रयोग संपूर्ण कारकीर्दीतील आऊटबॉक्स ठरेल, भविष्यात देशभर तो राबवला जाईल, असे तेव्हा अजिबात वाटले नव्हते, अशी भावना या संकल्पनेचे जनक, निवृत्त सनदी अधिकारी ई. झेड. खोब्रागडे यांनी ‘दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

मी १९८२ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून निवडलो गेलो. अधिकारी म्हणून राज्यभर काम करत होतो. देशाने राज्यघटना १९५० मध्ये स्वीकारली; पण अधिकारी मंडळींना संविधानाचा जो आत्मा समजला जातो, ज्याला सरनामा म्हणतात त्यातील समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, सामाजिक, आर्थिक, न्याय, सार्वभौम या संकल्पनांची नीट माहिती नसल्याची सल सतत जाणवत होती.

२००५ मध्ये मी नागपूर जिल्हा परिषदेचा सीओ म्हणून काम करत होतो, तेव्हा सर्व शिक्षा अभियान जोरात होतं. मी गावातल्या बऱ्याच शाळांत जायचो. तेव्हा मला कल्पना सुचली की, संविधानाचा सरनामा (प्रियांबल) जो आहे, त्याचा संस्कार विद्यार्थ्यांवर करायला पाहिजे. त्याचं जाहीर वाचन केल्यास, त्यावर निबंध स्पर्धा घेतल्यास, यात्रा काढल्यास या विद्यार्थ्यांबरोबरच नागरिकांनाही संविधानाची किमान तोंडओळख तरी होईल. अशी संकल्पना राबवण्यासाठी निधीची गरज नव्हती. त्यामुळे शासनाकडे विचारणा करण्याचा प्रश्नही नव्हता. बरे याला विवरोधाचीही शक्यता नव्हती. अशा प्रकारे २००५ मध्ये नागपुरात २६ नोव्हेंबरला प्रत्यक्षात संविधान दिवस पहिल्यांदा राबवला. त्यासाठी सामाजिक संस्थांची मदत घेतली होती. आम्ही त्या दिवशी यात्रासुद्धा काढली होती.
पुढं असं वाटू लागलं की, राज्यपातळीवर हा प्रयोग राबवायला पाहिजे. नंतर माझी समाजकल्याण विभागाचा संचालक म्हणून नेमणूक झाली. मंत्रालय पातळीवर त्यासाठी पाठपुरावा करण्यास सुरुवात केला. त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी ती उचलून धरली आणि २४ नोव्हेंबर २००८ रोजी सामान्य प्रशासन विभागाने संविधान दिन राज्यभर राबवण्याबाबत परिपत्रक काढले. आता हा प्रयोग देशपातळीवर होण्यासाठी मी प्रयत्न चालू केले. दरम्यान, मी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचा कार्याधिकारी म्हणून निवृत्त झालो होतो. शरद पवार आणि सुशीलकुमार शिंदे यांनी मला नेहमीच मदत केली.
पीएमओनेही कल्पना उचलून धरली
मी पंतप्रधान कार्यालयाकडे पत्रव्यहार केला. देशभर संविधान दिन राबवावा याच्यासाठी पाठपुरावा करत राहिलो. पंतप्रधान कार्यालयाने त्याची दखल घेतली आणि यंदापासून हा प्रयोग देशभर राबवण्यास सुरुवात होत आहे. मी चंद्रपूर जिल्ह्यातला आहे. आंबेडकरी चळवळीत आमचे घर अग्रभागी होते. भारताचं संविधान हे मानवमुक्तीचा जाहीरनामा आहे, असे मला वाटते. अशा संविधानाचा संस्कार देशातल्या भावी पिढीवर व्हावा यासाठी काही करू शकलो, याचा अतिव आनंद आहे, असे खोब्रागडे म्हणाले.