आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Aap's New Aim Municipal Corporations, Delhi Model Use In Maharashtra

‘आप’चे आता ‘मिशन महापालिका’, दिल्लीचे ‘टॉक’ मॉडेल महाराष्ट्रात वापरणार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिल्ली विधानसभेच्या ऐतिहासिक यशामुळे आत्मविश्वास दुणावलेल्या ‘आप’च्या महाराष्ट्र कार्यकारिणीने राज्यात या वर्षभरात होत असलेल्या औरंगाबाद, कल्याण-डोंबिवली, कोल्हापूर, वसई-विरार, नवी मुंबई या पाच बड्या मनपा निवडणुकांसाठी ‘मिशन पालिका’ मोहीम आखण्याचे निश्चित केले आहे. त्यासाठी ‘दिल्ली टॉक’चा प्रयोग करणार असल्याचे ‘आप’ नेते सुभाष वारे यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितले.

जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांबरोबरच पाच महापालिकांच्या निवडणुका या वर्षी होत आहेत. दोन वर्षांनंतर मुंबई महापालिकेची निवडणूकही होणार आहे. ‘आप’ राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत उतरणार आहे. तरी या पक्षाचे मुख्य लक्ष महापालिकांवर आहे.

दिल्ली विधानसभेसाठी आपने ‘दिल्ली टॉक’ प्रयोग राबवला होता. हा प्रयोग म्हणजे एका रविवारी एका समुदायाशी संवाद. युवक, ज्येष्ठ नागरिक, महिला, अल्पसंख्याक अशा प्रत्येकाशी संवाद साधला. त्यानंतरच जाहीरनामा बनवण्यात आला. ते दिल्ली मॉडेल आम्ही येथे वापरणार आहोत, असे वारे म्हणाले.

मुंबईवरही लक्ष्य : लोकसभा निवडणुकांतील अपयशानंतर ‘आप’ने ‘मिशन विस्तार’ कार्यक्रम हाती घेतला होता. त्याअंतर्गत पक्षाने मुंबई मेट्रो रिजन (एमएमआर) समित्यांची स्थापना केली. मुंबईत ‘आप’च्या आजमितीस ३६ विधानसभा समित्या, २२७ वॉर्ड आणि ६ जिल्हा समित्या कार्यरत आहेत. या समित्या व कार्यकर्त्यांच्या बळावर
३५ हजार कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या बृहन्मुंबई पालिकांवर ‘आप’चा झेंडा फडकवेल, असा दावा पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य मयंक गांधी यांनी केला.

ग्रामीण भागावर डोळा
राज्यातील शेतक-यांच्या वाढत्या आत्महत्या आणि भूमिहीन शेतमजुरांचे समस्यांच्या प्रश्नी ‘आप’ लक्ष घालणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र ‘आप’ने पुण्यातील बैठकीत दोन स्वतंत्र समित्या स्थापन केल्या आहेत.

स्वराज्य अभियान
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ‘आप’ने स्वराज्य अभियानाची आखणी केली आहे. त्याअंतर्गत राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भ्रष्टाचार विरोधी हेल्पलाइन व नगरराज बिलाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.