आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हल्ल्यानंतर केईएममध्ये सीसीटीव्ही, ३० ऑक्टोबरपर्यंत ३२ ठिकाणी लागणार कॅमेरे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- परळ येथील केईएम रुग्णालयात येत्या ३० ऑक्टोबरपर्यंत महत्त्वाच्या ३२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. तसेच या रुग्णालयातील डॉक्टरांच्या सुरक्षा व्यवस्थेसाठी विशेष सुरक्षा रक्षक नेमण्यात येणार असून महाराष्ट्र सुरक्षा मंडळाचे सुरक्षा रक्षकही सुरक्षिततेची व्यवस्था पाहणार असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शनिवारी दिली.
दोन दिवसांपूर्वी केईएममधील एका बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर संतप्त नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केली होती. या घटनेनंतर संतप्त झालेल्या सुमारे सातशे निवासी डॉक्टरांनी मारहाणीच्या निषेधार्थ संपावर जाण्याचा निर्णय घेतल्याने केईएमची रुग्णसेवा कोलमडून पडली होती. दरम्यान, हा संप मागे घ्यावा, असे आवाहन मुंबईच्या महापौरांनी केले आहे. शनिवारी विनोद तावडे यांनी केईएम रुग्णालयाला भेट दिली.
अजामीनपात्र कलम
सुरक्षा व्यवस्थेबरोबर पोलिसांचा बंदोबस्तही रुग्णालयात कायम राहणार आहे. रुग्णांना देण्यात येणारी वैद्यकीय सेवा सुरळीत ठेवण्याबाबत पावले उचलण्यात येतील. तसेच डॉक्टरांना झालेल्या मारहाणीत दोषींना तातडीने अटक करून त्यांच्याविरोधात अजामीनपात्र कलम लावण्यात येईल. रुग्णालयात सध्या बसवण्यात आलेले नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.