आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्करच्या न्यायालयात होणार "कोर्ट'चा न्यायनिवाडा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कमीत कमी संवाद, स्थिर कॅमेरा व वास्तव वाटणाऱ्या चित्रभाषेतून सामाजिक विषमतेचे जळजळीत सत्य मांडणारा चैतन्य ताम्हाणे दिग्दर्शित "कोर्ट' हा मराठी चित्रपट पुढील वर्षी होणाऱ्या प्रतिष्ठेच्या ८८ व्या ऑस्कर पुरस्कारासाठी भारताकडून पाठवला जाणार आहे.

यंदा फिल्म फेडरेशन ऑफ इंडियापुढे ३० चित्रपट आले होते. त्यात मसान, बजरंगी भाईजान, पीके, बाहुबली, हैदर, काका मुट्टाई अशा चित्रपटांची यादी होती. विशेष म्हणजे यंदाच "कोर्ट'ला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तसेच या चित्रपटाने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर व विविध फिल्म फेस्टिव्हलमध्ये एकूण २७ पुरस्कार मिळवले आहेत.
एका लोकशाहिरावर समाजात क्रांतीचे वातावरण पसरवत असल्याचा ठपका ठेवून न्यायालयीन लढाईत गोवले जाते. या लढाईत न्यायालये, पोलिस व सरकार या प्रस्थापित व्यवस्था चळवळींचा कसा बळी घेतात आणि या चळवळी दाबण्यामागे जातीय उतरंड कशी मदत करते, याचे प्रत्ययकारी चित्रण या चित्रपटातून मांडण्यात आले आहे.

या पूर्वी "श्वास' व "हरिश्चंद्राची फॅक्टरी' या दोन मराठी चित्रपटांनी ऑस्करपर्यंत धडक मारली होती पण हे दोन्ही चित्रपट ऑस्करच्या अंतिम नामांकनात समाविष्ट होऊ
शकले नाहीत.

"कोर्ट'ची परीक्षा सुरू
सर्वोत्कृष्ट परदेशी चित्रपटांच्या वर्गवारीत जगभरातून विविध भाषांतील चित्रपट अाॅस्कर पुरस्कारासाठी पाठवण्यात येत असतात. या चित्रपटांचा दर्जा, चित्रपटाची वैश्विक सत्याला अधोरेखित करणारी मांडणी, कलाकारांचा अभिनय व अन्य तांत्रिक बाजू लक्षात घेऊन ऑस्कर समिती अंतिम पुरस्कारासाठी पाच चित्रपटांची निवड करते. या अंतिम निवडीत "कोर्ट'ला आपली बाजू मांडावी लागणार आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल
या चित्रपटाचा विषय व त्याची मांडणी ही सर्वस्वी भिन्न होती आणि त्याची दखलही आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली होती. हा चित्रपट नुकताच अमेरिकेतही प्रदर्शित झाला आहे आणि या चित्रपटाचे न्यूयॉर्क टाइम्सने केलेले परीक्षण चांगले होते. त्यामुळे "कोर्ट' ऑस्कर ज्युरीपर्यंत जाण्यास मदत होईल.
गीतांजली कुलकर्णी, अभिनेत्री
धक्कादायक, आनंदीही
हा चित्रपट ऑस्करसाठी जात असल्याचे पाहून विश्वासच बसत नाही. मात्र, हा आश्चर्याचा धक्का आहे. हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर उमटलेल्या संमिश्र प्रतिक्रिया पाहता आम्ही अपेक्षा फार उंच ठेवल्या नव्हत्या, तरीही निवड मंडळाने या चित्रपटाची ऑस्करसाठी निवड केल्यामुळे त्यांचे आभार मानतो.
चैतन्य ताम्हाणे, लेखक, दिग्दर्शक
सर्वच भारतीयांसाठी अभिमानास्पद क्षण
ही घटना सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. एका मराठी चित्रपटालाही मिळालेला हा सन्मान आहे. हा चित्रपट कोणा एका व्यक्तीला केंद्रस्थानी धरून केलेला नाही. माझी सर्वसामान्यांना विशेषत: मराठी मुलखाला विनंती आहे की, कोर्ट ऑस्करसाठी जातोय तर या चित्रपटाच्या लॉबिंगसाठी लागणारा खर्च खूप असून त्यासाठी सर्वांनी मदत करण्याची वेळ आली आहे. मी व्यक्तिश: आर्थिक भार उचलणार आहे.
वीरा साथीदार, चित्रपटातील बंडखोर शाहीर