आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता ‘शिवार ते घर’ थेट शेतमाल विक्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘शिवार ते घर’ अशी थेट शेतमाल विक्रीची व्यवस्था उभी करणाऱ्या संत सावता माळी योजनेला राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता शहरांमध्ये तात्पुरत्या स्वरुपात शेतमाल विक्री सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याची माहिती राज्याचे पणन आणि कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी विधानसभेत दिली. या योजनेमुळे उत्पादक शेतकरी ते ग्राहक या घटकांदरम्यानची दलालांची साखळी मोडीत निघून शेतकऱ्याच्या शिवारातून शेतमाल थेट ग्राहकाच्या दारात आणला जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्य सरकारने विधानसभेत नुकतीच पणन सुधारणा विधेयकाला मंजूरी देत शेतमाल विनियमन मुक्ती केली असून आता शेतकऱ्यांना आडत न भरता आपला शेतमाल थेट शहरांमध्ये विक्रीसाठी आणण्याची मुभा मिळालेली आहे. परंतु शहरांमधे थेट विक्रीची सुविधा नसल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण होत होती. या योजनेद्वारे ही अडचण दूर होणार असून “शिवार ते घर’ अशी थेट शेतमाल विक्रीची व्यवस्थाच सरकार शेतकऱ्यांना उभारून देणार आहे. सध्या शहरांमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी तात्पुरती विक्री करण्यासाठीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. सकाळच्या वेळी ही सुविधा उपलब्ध असणार आहे. शहरामंधील विक्रीची ही सुविधा स्थायी स्वरुपात नसून फक्त विक्री पूर्ण होईपर्यंत तात्पुरत्या स्वरुपात असेल असेही राज्यमंत्री खोत यांनी स्पष्ट केले.
कसे असेल अभियान?
>नगरपालिका आणि महानगरपालिका आणि इतर संस्थांच्या मागणीनुसार आठवडे बाजार
>अभियान राबवण्यासाठी महाराष्ट्र कृषी पणन मंडळ समन्वय संस्था स्थापन करून आठवडे बाजार चालवण्यासाठी पणन मंडळ आयोजकांची नेमणुक करणार
>आठवडे बाजारात फक्त ताजी फळे आणि भाजीपाला विक्री
>या आठवडे बाजारात आयोजक असलेल्या शेतकरी, उत्पादक संस्था, ग्राहक सहकारी संस्था आणि खरेदीविक्री संघ यांचा समन्वय साधला जाणार आहे.
>आठवडे बाजाराच्या ठिकाणी बाजार व्यवस्था आणि समन्वया सोबतच ठरवून दिलेल्या दिवशी वेळेवर शेतकरी बाजार भरवण्याची जबाबदारी पणन मंडळाची
>या आठवडे बाजाराची प्रचार, प्रसिध्दीची जबाबदारी आयोजक आणि पणन मंडळाची असेल
>आठवडे बाजाराच्या खर्चासाठी स्टॉलधारकारडून शुल्क निश्चिती आणि वसुलीची जबाबदारीही पणन मंडळाची असेल.
बातम्या आणखी आहेत...