आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मच्छिमारांना अखेर सवलतीत डिझेल देण्याचा निर्णय; मुख्यमंत्र्यांची यशस्वी शिष्टाई

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मच्छिमारांना डिझेलवर पूर्वीप्रमाणे सवलत देण्यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले असून, मच्छिमारांना डिझेल खरेदीवरची सवलत पूर्ववत करण्याचा निर्णय पेट्रोलियम मंत्रालयाने घेतला आहे. याबद्दल केंद्रीय पेट्रोलियम मंत्री वीरप्पा मोइली यांचे मुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहे.

मच्छिमार हे त्यांच्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर डिझेल खरेदी करीत असले तरी ते इतर ठोक खरेदीदार नसून, किरकोळ खरेदीदारच आहेत. डिझेलचे दर देखील वाढले असल्याने मच्छिमारांच्या व्यवसायावर मोठा परिणाम होत आहे ही बाब मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मच्छिमारांच्या मागणीसाठी मुख्यमंत्री नुकतेच दिल्ली येथे केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांना त्याचप्रमाणे काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना शिष्टमंडळास भेटले होते.

मच्छिमारांसाठी देण्यात आलेल्या इंधन पंपांमधून 18 जानेवारी 2013 पासून मच्छिमारांनी डिझेल घेणे बंद केले होते. मच्छिमार हे किरकोळ खरेदीदार असून, त्यांचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी एकत्र येवून सहकारी तत्वावर ही डिझेल खरेदी केल्यामुळे त्यांना ठोक खरेदीदार म्हणणे उचित नाही असे पेट्रोलियम मंत्र्यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्र्यांनी पेट्रोलियम मंत्र्यांचे आभार मानतांना म्हटले आहे की, या निर्णयामुळे पूर्वीप्रमाणे व्यवसाय करणे सोयीचे होईल. त्याचप्रमाणे त्यांना डिझेलवरील सवलतीचा लाभ मिळाल्याने आर्थिक तोटा सहन करावा लागणार नाही.