आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कृषी खात्यातही 125 कोटींचा घोटाळा? राज्य सरकारवर आणखी एक आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चिक्की व अग्निशमन यंत्राच्या कंत्राटानंतर आता कृषी खात्याने खरेदी केलेल्या बीबीएफ यंत्र (गादी वाफा व रूंद सरी-वरंबा बनविण्याचे मशिन) खरेदी कंत्राटात गैरव्यवहार झाल्याचे वृत्त आहे. एका इंग्रजी वृत्तपत्राने याबाबत वृत्त दिले आहे. विशेष म्हणजे याबाबतची तक्रार खुद्द भाजप आमदारानेच दिल्याने हा घोटाळा युती सरकारचा आहे की आघाडी सरकारचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
आताचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे आघाडी सरकारमध्ये कृषी मंत्री होते. तर आता एकनाथ खडसेंकडे हे खाते आहे. हे वृत्त प्रकाशित झाल्यानंतरही भाजप सरकार अथवा विरोधकांनीही यावर अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.
आज प्रकाशित झालेल्या वृत्तात म्हटले आहे की, विदर्भ व मराठवाड्यातील शेतक-यांना कृषी विभागांतर्गत काही शेतीपयोगी मशिनरी पुरविण्याचा कार्यक्रम हाती घेतला होता. शेताची नागरट केल्यानंतर गादी वाफे तयार करण्याबरोबरच रूंद सरी व वरंबा बनविण्यासाठी बीबीएफ यंत्र शेतक-यांना उपयुक्त ठरेल असा दावा कृषी खात्याने केला होता. त्यानुसार मागील काही महिन्यांपासून या यंत्राचे वाटप झाले आहे. मात्र, ही यंत्रे शेतक-यांसाठी काहीही उपयोगाची नाहीत अशा तक्रारी शेतक-यांनी केल्या. या मशिनद्वारे पेरणी केल्यास 20 टक्के उत्पादन वाढेल असा दावा यंत्र पुरविणा-या कंपनीने केला होता. मात्र, तो साफ खोटा ठरला आहे. याशिवाय यंत्र खरेदीचे कंत्राट देतानाही नियमांचा भंग केला आहे. तसेच यात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप होत आहे.
या यंत्राची खरेदी करताना पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठातून यंत्रांची तपासणी करणे बंधनकारक होते. मात्र ही तपासणी हैदराबादमधील एका त्रयस्त संस्थेकडून करवून घेण्यात आली. पंजाबराव देशमुख विद्यापीठाने या यंत्रात काही बदल सुचवले होते, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले आहे, त्यामुळे विदर्भातील (अमरावती) भाजपचे आमदार सुनील देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसह संबंधित विभागाकडेही तक्रार दाखल केली आहे.
बातम्या आणखी आहेत...