आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरजूला आता हाकेच्या अंतरावर रक्ताची मदत,ब्लड ऑन कॉल योजनेला राज्यभरात प्रारंभ

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रगत तंत्रज्ञानाने वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवून आणले तरी अजूनही रक्त कृत्रिमरीत्या तयार करता येत नाही. मानवी जीवनातील रक्ताचे महत्त्व लक्षात घेऊन राज्य शासनाने ‘ब्लड ऑन कॉल’ योजना आजपासून राज्यभरात सुरू केली असून यापुढे गरजू रुग्णांना एका फोन कॉलवर रक्त मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मंगळवारी केले.गरजू रुग्णांना वेळेवर शासकीय शुल्कात रक्त उपलब्ध करून देणारी जीवन अमृत सेवा (ब्लड ऑन कॉल) योजना आजपासून राज्यभरात सुरू करण्यात आली. या योजनेचा शुभारंभ समारंभ जे. जे. महानगर रक्तपेढीमध्ये झाला. अध्यक्षस्थानी उपमुख्यमंत्री अजित पवार होते. आरोग्यमंत्री सुरेश शेट्टी, राज्यमंत्री फौजिया खान, आमदार सर्वश्री मधू चव्हाण, अमीन पटेल यांचीही प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मुख्यमंत्री चव्हाण म्हणाले की, राज्य शासनाने सामान्य नागरिकांना निरोगी आरोग्य लाभावे यासाठी अनेक अभिनव योजना सुरू केल्या आहेत. राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना आता राज्यभर लागू करण्यात आली आहे. या योजनेपाठोपाठ अजून एक लोकाभिमुख योजना आम्ही आजपासून राज्यातील जनतेला अर्पण करत आहोत.
104 या क्रमांकावर दूरध्वनी केल्यास तासाभरात गरजू रुग्णाला रुग्णालयात रक्त उपलब्ध करून देण्याची योजना सुरू केली आहे. जानेवारीअखेरीस आपत्कालीन वैद्यकीय सेवा (ईएमएस) सुरू करण्यात येणार असून या योजनेमुळे आपत्कालीन परिस्थितीत रुग्णवाहिकेच्या साहाय्याने गरजूंना पहिल्या तासात आवश्यक
ती वैद्यकीय मदत मिळणार आहे. लवकरच महाराष्‍ट्राच्या ग्रामीण भागातील जनतेला मोफत औषधे देण्याची योजना
केंद्र सरकारच्या साहाय्याने राबवली जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. या वेळी रक्तदान शिबिराच्या माध्यमातून सर्वाधिक रक्त संकलन करणा-या राज्यभरातील दहा संस्थांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
तासाभरात रक्त उपलब्ध : मोबाइल वा लँडलाइनवरून 104 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क करून रुग्णालयाचे नाव आणि पत्ता सांगा. एक तासाच्या आत 40 कि. मी. परिसरातील रक्तपेढीची मोटरसायकल तुमच्याजवळ रक्त घेऊन पोहोचेल. तुम्ही कॉल केल्यास हा कॉल प्रथम पुण्यातील कॉल सेंटरला जाईल. तेथून तुमच्या जवळच्या रक्तपेढीत निरोप जाईल.
सक्ती केल्यास कारवाई : जी खासगी रुग्णालये रुग्णांना एका विशिष्ट रक्तपेढीकडूनच रक्त घेण्याची सक्ती करतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आरोग्यमंत्री शेट्टी यांनी दिला. त्यामुळे आता यानंतर लोकांची कठीण काळात पिळवणूक होणार नाही आणि तात्काळ रक्त उपलब्ध झाल्याने दगदग करण्याची चिंताही मिटेल.