आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सर्व हॉटेल्समध्ये महाराष्ट्रीयन पदार्थ, हॉटेल मालक संघटनेची आठवले यांना ग्वाही

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘मुंबईसह राज्यभरातील सर्वच प्रकारच्या हॉटेल्समध्ये यापुढे महाराष्ट्रीयन पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील’, अशी ग्वाही हॉटेल मालकांच्या संघटनेने रिपाइं अध्यक्ष व खासदार रामदास आठवले यांना बुधवारी दिली. त्यामुळे यापुढील काळात मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेल्समध्ये मराठी तडका असलेले पदार्थ खायला मिळतील.

मुंबईतील काही हाॅटेल्समधील मराठी पदार्थ मिळत नसल्याच्या तक्रारी हाेत्या. त्याची दखल घेत आठवले यांनी या मागणीसाठी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. बुधवारी आठवलेंच्या वांद्रे येथील संविधान निवासस्थानी इंडियन हॉटेल अँड रेस्टॉरंट्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चा केली. आठवलेंची मागणी मान्य करण्याचा निर्णय जाहीर केला. या वेळी पक्षाचे पदाधिकारी विवेक पंडित उपस्थित होते.

मुंबईसह राज्यातील सर्व हॉटेलमध्ये मराठमोळे पदार्थ मिळावेत ही आठवलेंची मागणी होती. आठवलेंच्या या मागणीचा सन्मान ठेवत संघटनेने ही मागणी मान्य केली आहे. यामुळे आता सर्व हॉटेलमध्ये मराठी पदार्थ मिळतील.
संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी म्हणाले, आम्हाला महाराष्ट्रीयन पदार्थ हॉटेल्समध्ये ठेवण्यास आनंद वाटेल. सध्या काही हॉटेल्समध्ये हे पदार्थ मिळतात. मात्र, यापुढे सर्व हॉटेल्समध्ये असे पदार्थ उपलब्ध करून देण्यात येतील. मेनूकार्डमध्येदेखील अशा पदार्थांची नावे समाविष्ट करण्यात येतील.

मेनूत बटाटा वडा, कांदेपाेहे व इतर पदार्थ
आम्ही रामदास आठवले यांच्या सूचनेप्रमाणे प्रत्येक छाेट्या- माेठ्या हाॅटेलमध्ये धपाटे, थालीपीठ, पुरणपोळी, लाडू, चकली, शेव, शिरा, उसळ, पिठले, झुणका, आमटी, सार, खीर, भुरका, भरडा, साबुदाणे वडे, बटाटा वडा, कांदे पोहे, मिसळ, वडापाव आणि इतर पदार्थ ठेवणार आहोत. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येईल, असे संघटनेचे अध्यक्ष आदर्श शेट्टी यांनी या वेळी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...