आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now Ministers Will Not Have Authority Of Transfer Of Officers

मंत्र्यांकडून काढले बदलीचे अधिकार, प्रशासन सुधारण्याच्या दिशेने सरकारचे पहिले पाऊल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - प्रशासकीय सुधारणांच्या दृष्टीने पहिले पाऊल टाकत फडणवीस सरकारने शुक्रवारी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. यात काही विभागातील बदल्यांचे निर्णय आता मंत्रालय स्तरावरून न हाेता क्षेत्रीय पातळीवरून हाेतील, असे सरकारने जाहीर केले आहे. या निर्णयाची सुरुवात जलसंपदा तसेच अन्न व औषध विभागातील अधिका-यांच्या बदल्यांपासून हाेणार आहे.
जलसंपदा विभागात मोठ्या प्रमाणावर अ व ब गटातील अधिकारी असून त्यामधील कार्यकारी अभियंता यांच्या बदलीचे अधिकार मुख्यमंत्र्यांकडे होते, ते आता जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिवांकडे देण्यात आले आहेत. तर उप अभियंत्यांच्या बदल्यांचे अधिकार जलसंपदा मंत्र्यांकडून मुख्य अभियंत्यांना देण्यात आले आहेत. शाखा अभियंता, कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता श्रेणी २ गट यांच्या बदल्या आता मुख्य अभियंता हे अधिक्षक अभियंता यांच्या सल्ल्याने करतील. हे अधिकार पूर्वी जलसंपदा राज्यमंत्र्यांकडे होते.

अन्न व औषध प्रशासनतील औषध निरीक्षक, वैज्ञानिक अधिकारी, अन्न सुरक्षा अधिकारी, प्रशासकीय अधिकारी यांच्या बदल्यांचे अधिकार आयुक्तांना देण्यात आले आहेत. यापूर्वी हे अधिकार अन्न व औषध प्रशासन खात्याच्या मंत्र्यांकडे होते. औषध निरीक्षकांची १६१ पदे असून अन्न सुरक्षा अधिका-यांची २६५ पदे आहेत.

अन्न-औषधे भेसळीला आळा बसेल : पतंगे
भेसळखोरांना संरक्षण देणारे मंत्र्यांना रसद पुरवून मलाईदार पोस्टिंग वा बदल्या प्राप्त करायचे. कोणती अधिकारी प्रामाणिक व कार्यक्षम आहे, हे खरेतर अन्न व औषध प्रशासन आयुक्तांना माहित असते. त्यामुळे अशा अधिका-यांचा कार्यक्षमपणे वापर करवून घेण्यास आजवर आयुक्तांना मर्यादा येत होत्या. पुरूषोत्तम भापकर हे सध्याचे आयुक्तही कार्यक्षम अधिका-यांना प्राधान्य देणारे असल्याने आता राज्यातील भेसळबाजांवर कठोर कारवाई होईल आणि अन्न-औषध प्रशासनाचा कारभारही पारदर्शक होईल, अशी आशा महाराष्ट्र अन्न निरिक्षक अधिकारी संघटनेचे सचिव व राजपत्रित महासंघाचे संघटन सचिव संदीप पतंगे यांनी व्यक्त केली.
भेटीगाठी संस्कृती कमी होईल : कुलथे
बदल्यांच्या अधिकारांचे विकेंद्रीकरण केल्याने गेली अनेक वर्षे बदल्यांमध्ये सुरू असलेला भ्रष्टाचार तसेच मंत्रालयात रूढ असलेली भेटीगाठीची संस्कृती कमी होण्यास मदत होईल, अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे ग. दि. कुलथे यांनी व्यक्त केली आहे.