आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाता आमदारांना हवीय इन्कम टॅक्स माफी, मंत्रिमंडळही करणार चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - वेतन दुप्पट करून घेऊनही समाधान न झालेल्या आमदारांना अाता वाढीव वेतनावर प्राप्तिकर भरणेही नकोसे झाले आहे. त्यामुळे आपल्या वेतनाला प्राप्तिकरात सूट देण्यात यावी, अशी मागणी या आमदारांनी लावून धरली आहे. राज्य सरकारही त्यावर गंभीर असून अागामी मंत्रिमंडळ बैठकीत या विषयावर चर्चा होणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.
अामदारांचे वेतन ७५ हजारांहून अाता दीड ते पावणे दोन लाखांपर्यंत पोहोचले आहे. वेतनवाढीसाठी सर्वपक्षीय आमदारांनी एकजूट दाखवत सरकारवर दबाव आणला होता. मात्र आता हेच आमदार वाढीव पगारावर प्राप्तिकर (इन्कम टॅक्स) भरावा लागू नये यासाठी सरकारवर दबाव आणत आहेत.

राज्याला अधिकारच नाहीत
‘प्राप्तिकर माफ किंवा कमी करण्याचे अधिकार राज्याला नसून केंद्र सरकारला अाहे. राज्य सरकार केवळ वेतन करमुक्त करण्याचा वा कर कमी करण्याची विनंती केंद्राला करू शकते. मात्र याबाबत अंतिम निर्णय केंद्रीय अर्थमंत्रीच घेऊ शकतात. प्राप्तिकरात सवलत द्यायची असेल तर केंद्रीय अर्थसंकल्पात त्याची घोषणा करावी लागेल. मात्र तोवर तरी आमदारांची प्राप्तिकरातून सुटका शक्य नाही,’ असे प्राप्तिकरतज्ज्ञ प्रदीप गुडसूरकर यांनी सांगितले. आमदारांना दिली जाणारी रक्कम ही वेतनाऐवजी मानधन असती तर त्यांना प्राप्तिकर लागला नसता. कारण प्राप्तिकर कायद्यात मानधनाला सूट देण्यात आलेली अाहे. खरे तर आमदार हे जनतेची सेवा बजावतात त्यामुळे त्यांना देणारी रक्कम मानधन असते. मात्र राज्याने पारित केलेल्या कायद्यात ‘वेतन व भत्ते’ हा शब्द असल्याने आमदारांना कर द्यावा लागेल,’ असेही गुडसूरकर यांनी स्पष्ट केले.

किमान ३.५ लाख कर
नव्या वेतनानुसार अामदारांचे किमान वार्षिक उत्पन्न हे १८ लाख हाेईल. ३ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर प्राप्तिकर लागत नाही. मात्र ३ ते ५ लाखपर्यंतच्या उत्पन्नावर १० टक्के, ५ ते १० लाखांसाठी २० टक्के तर १० लाखांहून अधिक उत्पन्नासाठी ३० टक्के कर लागताे. या करावर ५ टक्के अधिभारही (सरचार्ज) आकारला जातो. त्यामुळे आमदारांना तीन लाख ४६ हजार प्राप्तिकर आणि त्यावर ५ टक्के अधिभार मिळवून एकूण ३ लाख ६३ हजार ३०० प्राप्तीकर दरवर्षी भरावा लागणार आहे. त्यामुळे हा कर भरावाच लागू नये यासाठी अामदार खटाटाेप करत अाहेत.
बातम्या आणखी आहेत...