आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Now State Bjp Leaders Meet To Raj Thackeray At Mumbai

\'राज\' भेटीची भाजप नेत्यांना हौस भारी, आता विधान परिषदेसाठी साकडे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- भाजपच्या नेत्यांना हल्ली राज ठाकरे स्वप्नातही येत असावेत, अशी परिस्थिती आहे. नितीन गडकरींनी राज यांची भेट घेतल्यानंतर उठलेले वादळ शमले नाही तोच आज विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे आणि मुंबई भाजपचे शहराध्यक्ष आशिष शेलार यांनी कृष्णकूंजवर जावून भेट घेतली. मात्र ही भेट विधान परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात होती. लोकसभेसाठी नाही. तसेच या भेटीची कल्पना महायुतीतील सर्व पक्षांना आहे असे सांगत शिवसेनेला याची कल्पना दिली होती अशी माहिती तावडे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
विधान परिषदेच्या 9 जागांसाठी येत्या 20 मार्च रोजी मतदान होत आहे. यासाठी राष्ट्रवादीने तीन, काँग्रेसने दोन, शिवसेना-भाजपनेही प्रत्येकी दोन-दोन उमेदवार करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र महायुतीचे चार उमेदवार निवडून येण्यास भाजप-सेनेला काही आमदार सदस्य संख्येची गरज आहे. मनसेकडे 12 आमदार आहेत. शिवसेना मनसेकडे थेट मदत मागू शकत नाही. त्यामुळे भाजपनेच मनसेला आमच्या उमेदवाराला मदत करण्यासाठी याचना केली आहे. मात्र, आजच्या भेटीत मनसेने होकार दिला की नकार याबाबत तपशील मिळू शकला नाही.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हेमंत टकले, ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्ष आनंद ठाकूर आणि किरण पावसकर यांनी गुरुवारी विधानपरिषदेसाठी अर्ज भरला. यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, ग्रामविकास मंत्री जयंत पाटील, अन्न व नागरी पुरवठा मंत्री अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड, आमदार विक्रम काळे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
विधान परिषदेवर निवृत्त होणा-यात शिवसेनेच्या नीलम गोर्‍हे, भाजपचे जयप्रकाश छाजेड, विनोद तावडेंसह पांडुरंग फुंडकर, तर राष्ट्रवादीचे हेमंत टकले, किरण पावसकर, रणजितसिंग पाटील आणि नुकतेच भाजपात डेरेदाखल झालेले संजय पाटील, काँग्रेसचे शिवाजीराव देशमुख आदी नऊ विधान परिषदेचे विद्यमान सदस्यांची सहा वर्षांची मुदत संपणार आहे.
त्यासाठीचे निवडणूक आयोगाने निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार निवडणुकीची अधिसूचना 3 मार्च 2014 रोजी जारी करण्यात आली आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 10 मार्च 2014 आहे. 11 मार्च रोजी अर्जांची छाननी होईल, तर, 13 मार्चपर्यंत उमेदारांना आपला अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 20 मार्च 2014 रोजी मतदान होईल. सकाळी 9 ते सायंकाळी चार पर्यंत मतदान होईल. त्यानंतर तासाभरात मतदान मोजणीस सुरूवात होईल रात्री 9 पर्यंत निवडणूकीचा निकाल जाहीर होईल.