आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रपुरुषांची सरकारी स्मारके फक्त दोनच... नव्या धोरणाला मुख्यमंत्र्यांची मंजूरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रपुरुष,थोर व्यक्ती, स्वातंत्र्यसैनिक, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व, संत-महात्मे आणि राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ती यांची स्मारके उभारण्याबाबत नव्या धोरणास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून त्याबाबत मार्गदर्शक तत्त्वांचा समावेश असणारा शासन निर्णयही काढण्यात आला आहे. या धोरणानुसार एकाच राष्ट्रपुरुषाची अथवा थोर व्यक्तीची राज्यात दोनपेक्षा जास्त स्मारके सरकारी निधीतून उभारता येणार नाहीत. ही दोन स्मारके वेगवेगळ्या प्रशासकीय विभागांत उभारावी लागतील. एखाद्या राष्ट्रपुरुषाचे तिसरे किंवा त्याहून अधिक स्मारके उभारायची असल्यास त्यासाठी लागणारी जमीन आणि इतर बाबींचा खर्च मागणी करणाऱ्यांनाच करावा लागेल.

ही मार्गदर्शक तत्त्वे केवळ राष्ट्रपुरुष अथवा थोर व्यक्ती यांच्या स्मारकाबाबत आहेत. अन्य मान्यवरांची स्मारके उभारताना नगरविकास विभाग आणि ग्रामविकास जलसंधारण विभाग हे सामान्य प्रशासन विभागाच्या अनुमतीने स्वतंत्रपणे मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणार आहेत. राज्य संरक्षित स्मारकांची घोषणा, त्यांची देखभाल आणि त्यासंबंधीच्या इतर बाबी या पर्यटन सांस्कृतिक विभागाकडून हाताळल्या जाणार असून एखाद्या वास्तूस राष्ट्रीय स्मारक घोषित करायचे झाल्यास त्याची तपासणी करून केंद्र शासनाकडे शिफारस केली जाईल. शासनाच्या पूर्वपरवानगीशिवाय स्मारकाची उभारणी केल्यास नगरविकास विभाग आणि ग्रामविकास, जलसंधारण विभागामार्फत त्याची तपासणी करून हे स्मारक हटवण्यात येईल किंवा संबंधितांकडून दंड अाकारून ते नियमितही करता येऊ शकेल,अशी तरतूद या नव्या धोरणात आहे.

सरकारी स्मारकासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली जाईल. त्यात मंत्री, पालकमंत्री, आमदार, इतिहासतज्ज्ञ, वास्तुशास्त्रज्ञ, समाजसेवकांचा गरजेनुसार समावेश असेल. अशी स्मारके शासकीय जमिनीवरच उभारण्यात येतील. गरज पडल्यास खासगी जमीन आधी शासनाच्या नावे करून घेतली जाईल. स्मारकाच्या देखभालीची जबाबदारी उभारणीपूर्वीच निश्चित करण्यात येणार असून त्याबाबत संबंधितांशी तसा करार करून घेतला जाईल.

- केवळ स्मारकच उभारण्याऐवजी नवीन समाजोपयोगी योजना सुरू करून त्यांना राष्ट्रपुरुषांची नावे द्यावीत. त्यातून त्यांच्या कार्याचे स्मरण करण्याचा प्रयत्न व्हावा.
- कमाल अडीच वर्षांच्या अात स्मारक पूर्ण करावे लागले. समितीने मान्य केलेले एक स्मारक पूर्ण झाल्यानंतरच नवीन स्मारक उभारणीचा विचार केला जाईल.

- राष्ट्रपुरुषांचे स्मारक यापुढे योजना म्हणून राबवली जाईल. त्यात केवळ पुतळ्याची उभारणी होणार नाही, तर शाळा, महाविद्यालये, रुग्णालये, बहुउपयोगी सभागृहे, संशोधन संस्था, ग्रंथालये, वाचनालये, वसतिगृहे इत्यादी समाजोपयोगी वास्तूंच्या स्वरूपात स्मारके उभारली जातील. राष्ट्रपुरुषांच्या जीवनाचे पैलू कार्याचा समावेश असेल अशा पद्धतीने स्मारकाची आखणी करून ती उत्कृष्ट पर्यटनस्थळे होण्यासाठी प्रयत्न केले जातील.
बातम्या आणखी आहेत...