आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • NPC Maharashtra Meeting With Bhaskar Jadhav And Jitendra Awhad

\'राष्‍ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विरोधकांना आक्रमक पण संयमाने उत्तर द्यावे\'

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये 16 जागांचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून आक्रमकपणे काम करण्याचा तसेच पक्षाच्या धर्मनिरपेक्ष प्रतिमेला धक्का बसेल अशा घटना टाळण्याचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांना बुधवारी देण्यात आला. प्रदेशाध्यक्ष भास्कर जाधव आणि कार्याध्यक्ष जितेंद्र आव्हाड यांनी सर्व जिल्हाध्यक्षांची मुंबईतील पक्षकार्यालयात बैठक घेऊन त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या लोकसभा निवडणुकांप्रमाणे 22 जागा लढवण्याचे आधीच जाहीर केले आहे. आतापर्यंत त्यांच्या खासदारांचा आकडा दोन अंकी झालेला नाही. त्यामुळे यावेळी 16 जागांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे. काँग्रेस, शिवसेना या पक्षांचे खासदार जास्त आहेत. भाजपचेही खासदार राष्ट्रवादीपेक्षा अधिक आहेत. अशावेळी राष्ट्रवादीने जोर लावून 22 मधल्या 16 जागा तर नक्की निवडून आणालया हव्यात, असे लक्ष्य उपस्थित कार्यकर्त्यांना देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
14 जणांची कोअर टीम
जिल्हापातळीपासून संघटन मजबूत करण्यासाठी ही पहिलीच बैठक घेण्यात आली होती. यानंतर दोनच दिवसांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी निवडलेल्या 14 जणांच्या कोअर टीमची बैठक होणार असून त्यांना लोकसभा मतदारसंघ विभागून देण्यात येणार आहेत. त्यांनी फक्त या मतदारसंघांमध्येच काम करून लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पक्षासाठी मजबूत स्थिती निर्माण करायची आहे.
राज्यभर दौरे करणार
आजच्या बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष जाधव यांनी विरोधकांच्या टीकेला आक्रमकपणे पण संयम राखून उत्तर देण्याचे आवाहन पदाधिकाºयांना केले. तसेच यापुढे पक्षांतर्गत तक्रारी करण्याऐवजी एकत्र येऊन विरोधकांशी मुकाबला करा, असे
ते म्हणाले. प्रदेशाध्यक्ष पद स्वीकारल्यानंतर जाधव यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे कार्यकर्त्यांशी चर्चा केली व त्यांना लोकसभा निवडणुकीच्यादृष्टीने मार्गदर्शन केले. पुढील महिन्यापासून जाधव व आव्हाड यांचे राज्यभर दौरे सुरू होणार असून त्यासाठी पक्ष कार्यकर्त्यांकडून राज्यातील राजकीय परिस्थिती समजावून घेतली जाणार आहे.

माध्यमांशी चांगले संबंध ठेवा : नवाब मलिक
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाच्या धर्मनिरपेक्षतेची घडी कायम ठेवून स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारे तडजोड नको, असे आमदार आव्हाड यांनी कार्यकर्त्यांना बजावले. राष्ट्रवादी काँग्रेसची धर्मनिरपेक्ष म्हणून असलेल्या प्रतिमेला धक्का लागता कामा नये. पुढील महिन्यात या जिल्हाध्यक्षांची परत बैठक घेऊन त्यांच्याशी आणखी सविस्तर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवक्ते नवाब मलिक यांनी माध्यमांशी चांगले संबंध ठेवण्यास सांगून आपल्या पक्षाची भूमिका प्रभावीपणे कशी मांडवी याबद्दल मार्गदर्शन केले.