आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वॉर रूम- राष्ट्रवादी काँग्रेस : कुशल टीमच्या जोरावर ‘घड्याळा’चा गजर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘हा प्राणी कसा हाताळावा आम्हाला कळत नाही, याची जबाबदारी तुम्हीच घ्या,’ अक्षरश: या शब्दांत केंद्रीय कृषिमंत्री शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सोशल मीडियाची जबाबदारी नितीन वैद्य यांच्यावर सोपवली. सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सचा आपल्या पक्षाच्या प्रचारासाठी सर्वात चांगला वापर करणारा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव घ्यावे लागेल.
वैद्य यांची ड्रायव्हिंग माइंड्स इनोव्हेशन्स कंपनी सध्या राष्ट्रवादीचा सोशल मीडिया सांभाळत आहे. मुंबईतल्या चर्चगेट भागात एका जुन्या, रेशम भवन या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरचं एक छोटेखानी पण कॉर्पोरेट लूक असलेलं कार्यालय.. कॉम्प्युटर्स आणि लॅपटॉपवर काम करत असलेल्या पंधरा-वीस तरुण-तरुणी.. तीस-पस्तीस जणांच्या चमूचे नेतृत्व करतात पराग पाटील.. खरं तर या लोकांचा पक्षाशी तसा थेट संबंध नाही किंवा ते पक्षाचे कार्यकर्तेही नाहीत.
सहा महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून पक्षाला प्रसिद्धी देण्याचे काम खासगी कंपनीकडे सोपवले. जगभरातल्या जवळपास 42 कोटी लोकांपर्यंत पोहोचण्यात यशस्वी, फेसबुक पेजला दिवसभरात सरासरी पन्नास हजार जणांची व्हिजिट, प्रतिदिनी 3 ते 4 हजार लाइक्स आणि जवळपास 300 ते चारशे कॉमेंट्स, एक लोकप्रिय ट्विटर हँडल, एक यूट्यूब अकाउंट आणि आतापर्यंत झालेल्या नेत्यांच्या लाइव्ह चॅटला सरासरी लाखभर लोकांचा प्रतिसाद अवघ्या सहा महिन्यांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोशल मीडिया सेलचे हे सगळे संचित आहे. प्रचारकी थाट टाळत पत्रकार आणि कुशल तंत्रज्ञांची ही टीम पक्षाला सोशल नेटवर्किंग साइट्सवर सतत चर्चेत ठेवण्याचा प्रयत्न करते.
‘पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांच्या सतत संपर्कात राहून आम्ही आमची दिशा ठरवतो. पक्षाच्या मीडिया सेलचीही मदत आम्हाला होते. पण आम्ही राज्यभरात बातमीदारांचे आमचे स्वत:चे असे एक जाळे आहे. त्यातूनही आम्हाला अनेक बातम्या मिळत असतात,’ असे पराग पाटील सांगतात. शिवाय प्रत्येक गोष्ट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तीन भाषांमधून प्रसारित होते. त्यामुळे पक्षाच्या फेसबुक पेजला ग्रामीण भागात चांगला प्रतिसाद मिळतो, असेही पाटील यांनी सांगितले.
लाइव्ह चॅटचा प्रयोग
राष्ट्रीवादीच्या पक्षस्तरावर एक मीडिया सेलसुद्धा कार्यरत आहे. या मीडिया सेलच्या प्रमुख पदाची जबाबदारी रवी वरपे सांभाळतात. पक्षाशी संबंधित माहिती गोळा करून ती पराग पाटील यांच्या टीमपर्यंत पोहोचवण्याची काळजी घेणे आणि माध्यमांच्या प्रतिनिधींशी समन्वय साधणे ही प्रमुख जबाबदारी रवी वरपे पार पाडतात. तसेच प्रदेशाध्यक्ष किंवा इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया किंवा दिवसभरातल्या पक्षातल्या महत्त्वाच्या घडामोडींविषयी प्रवक्त्यांच्या सल्ल्यानुसार नेत्यांचे लाइव्ह चॅट यासारख्या काही गोष्टींचे पराग पाटील यांच्यासह नियोजन करणे या महत्त्वाच्या कामाचीदेखील त्यांच्यावर जबाबदारी आहे. त्यासाठी रवी वरपे यांच्यासह सहा ते सात जणांची एक टीम कार्यरत आहे. अशा पद्धतीने दुहेरी पातळीवर राष्ट्रवादी काँग्रेस सोशल मीडियाचे मॅनेजमेंट करते.
नेटवर्किंग साइट्स विषयी
वेबसाइट -
ट्विटर हँडल
शरद पवार ट्विटर हँडल -
फेसबुक पेज -
यूट्यूब -
ई- कार्यकर्ता
सोशल नेटवर्किंग साइट्सवर सतत नव्या बातम्यांसह अपडेट्स राहण्यासाठी पराग पाटील यांनी राष्ट्रवादीसाठी ई -कार्यकर्ता ही संकल्पनासुद्धा राबवली आहे. या माध्यमातून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सोशल नेटवर्किंग साइट्सचा वापर कसा करावा याचे धडे दिले जातात. त्यासाठी छोट्या कार्यशाळा घेतल्या जातात.
कोण आहेत पराग पाटील ?
पत्रकारितेचा गाढा अनुभव, विविध वर्तमानपत्रांसाठी काम, ‘लोकप्रभा’ या मासिकाचे सहसंपादक आणि ‘प्रहार’ दैनिकाचे फीचर एडिटर म्हणून काम केल्यानंतर सध्या सोशल नेटवर्किंग साइट्सवर अभ्यास.