आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आयोजकांनी न पाहताच ‘न्यूड’ सिनेमाला इफ्फीतून डावलले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- गाेवा येथे हाेणाऱ्या अांतरराष्ट्रीय चित्रपट महाेत्सवातून (इफ्फी) ‘न्यूड’ हा मराठी चित्रपट वगळण्याच्या निर्णयाविराेधात तीव्र पडसाद उमटत अाहेत. अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे या निर्णयाचा निषेध व्यक्त करण्यात अाला, तर या महाेत्सवाचे परीक्षक व प्रसिद्ध निर्माते, दिग्दर्शक सुजाॅय घाेष यांनी थेट राजीनाम्याचा पवित्रा घेतला. या पार्श्वभूमीवर ‘न्यूड’ चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याशी ‘दिव्य मराठी’ने साधलेला संवाद..  
 
प्रश्न : ‘न्यूड’ व एस दुर्गा चित्रपट इफ्फीच्या इंडियन पॅनोरमातून वगळले गेल्याने चित्रपटसृष्टीत नाराजी अाहे. त्याबद्दल काय सांगाल?    
रवी जाधव : न्यूड हा चित्रपट तर महोत्सवातील शुभारंभाच्या चित्रपटांमध्ये प्रदर्शित करण्याचे ठरले होते. इफ्फीसाठी पाठवावयाच्या चित्रपटाची तीन महिने आधी नाेंदणी करून चित्रपटाची स्क्रीनर डीव्हीडी पाठवावी लागते. या स्क्रीनर डीव्हीडीमध्ये ९५ टक्के शूट झालेला चित्रपट असतो. त्यावरून नेमका चित्रपट काय आहे याची ज्युरींना कल्पना येते. मात्र, ज्युरींना अाम्ही हा फायनल चित्रपटही दाखवला. या महाेत्सवासाठी चित्रपट पाठवताना सेन्सॉर प्रमाणपत्राची गरज नसते. ‘न्यूड’ इफ्फीमध्ये दाखवला जाणार नाही, असे आता स्पष्ट झाल्यानंतर आम्ही त्याच्या सार्वत्रिक प्रदर्शनाच्या तयारीला लागलो आहोत.   
 
प्रश्न : ज्युरींना अंधारात ठेवून केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याने चित्रपटांना वगळण्याचा निर्णय घेतला का?  
रवी जाधव : हो. अगदी तसेच झाले आहे. इफ्फीमध्ये दाखवण्यासाठी विविध भाषांतील चित्रपट निवडण्याकरिता केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने ज्युरींची समिती नेमली होती. या महोत्सवासाठी ज्या चित्रपटांच्या प्रवेशिका आल्या ते सारे चित्रपट बारकाईने पाहून ज्युरींनी त्यातील जे चित्रपट निवडले त्याची यादी सरकारला कळवली होती. निवडलेल्या चित्रपटांची यादी ज्युरींनी गेल्या सप्टेंबर महिन्यात पाठवली होती.  या निर्णयात काही बदल करावेत, असे केंद्रीय माहिती व प्रसारण खात्याला वाटत असेल तर त्यांनी ज्युरींशी त्याबाबत चर्चा करणे हे नियमांनुसार बंधनकारक आहे. मात्र, या नियमांना बगल देत व ज्युरींना अंधारात ठेवून  माहिती व प्रसारण खात्याने इंडियन पॅनोरमा विभागातून न्यूड व एस दुर्गा हे चित्रपट वगळण्याचा निर्णय परस्पर घेतला. म्हणूनच सुजॉय घोष यांनी राजीनामा दिला. 
  
प्रश्न : तुमचे अायाेजकांवर काय अाक्षेप अाहेत?  
रवी जाधव : मी खात्रीने सांगतो की, माहिती व प्रसारण खात्याच्या माणसांनी हे दाेन्ही चित्रपट बघितलेलेच नाहीत. दुसरी गोष्ट न्यूड चित्रपट इफ्फीतून वगळला आहे, असे अायाेजकांनी मला कळवणे आवश्यक होते. पण तसे झाले नाही. उद्या अायाेजकांनी न्यूड चित्रपटाचा पुन्हा महोत्सवात समावेश केला तर येत्या २० नोव्हेंबरला या फेस्टिव्हलमध्ये जे शुभारंभाचे म्हणून चित्रपट दाखवण्यात येतील त्यात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची माझी पूर्ण तयारी आहे.
बातम्या आणखी आहेत...