आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Number Of Election Rally In Sunday, Today Rally End

आव्हानांवरून आवाहनांवर! अखेरच्या रविवारी प्रचार शिगेला, तोफा आज थंडावणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंधरा दिवसांपासून एकमेकांना आव्हान देणारे नेते रविवारी मात्र मतांसाठी आवाहन करताना दिसून आले. निवडणुकीच्या प्रचारतोफा सोमवारी सायंकाळी थंडावतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभूतपूर्व मतदानाचे आवाहन केले, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जनतेला दंडवत घातले. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी भावनिक आवाहन केले.

अभूतपूर्व मतदान करा, भाजपला बहुमत द्या - मोदी

ठाणे - पंधरा वर्षांच्या त्रासातून तुमची सुटका होणार आहे. अन्यायावर विजय मिळवण्याचा हा एक उत्सव आहे, अशा शब्दांत नरेंद्र मोदी यांनी अखेरच्या प्रचारसभेत मतदारांना अभूतपूर्व मतदान करण्याचे आवाहन केले.


राज्यातील आपल्या अखेरच्या भाषणात मोदींनी विरोधकांवर मोठा आरोप न करता फक्त बहुमत देण्याच्या आवाहनावरच भर दिला. आपल्या छोटेखानी भाषणात त्यांनी मतदारांना मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडण्याचे आवाहन केले. मुंबईकरांनी मतदानाचा एक नवा पायंडा देशाला घालून द्यावा. कोण आमदार, मंत्री होणार, कोण जिंकणार किंवा पराभूत होणार यासाठी ही निवडणूक नाही. महाराष्ट्राचे भाग्य ठरवणारी आहे, असे ते म्हणाले.


रेल्वेसाठी विदेशी गुंतवणूक आणू
सामान्य मुंबईकरांचे आयुष्य रेल्वेशी निगडित आहे. रेल्वेचे प्रश्न सुटल्यास लोकांचे सुटतील. म्हणूनच रेल्वेत शंभर टक्के विदेशी गुंतवणूक आणण्याचा आमचा इरादा आहे. यातून मुंबईच्या रेल्वेत आमूलाग्र बदल होईल. त्यासाठी केंद्राप्रमाणे राज्यातही एकाच पक्षाचे सरकार आणा, असे आवाहन मोदी यांनी केले.


माझ्या लढ्याला बळ द्या, ‘नतमस्तक’ होतो - उध्‍दव
मुंबई - युती तोडणाऱ्यांनो, आजवर प्रेम अनुभवले, आता शिवसैनिकांची धग अनुभवा, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी भाजपला इशारा दिला. माझ्या लढ्याला बळ द्या, मी तुमच्यासमोर नतमस्तक होतो, असे म्हणत त्यांनी जनसमुदायाला दंडवत घातले.
बीकेसी मैदानावरील या सभेचा मोठा गाजावाजा झाला होता. या सभेत उद्धव काहीतरी महत्त्वाची घोषणा करण्याचे कयास बांधले जात होते, परंतु तसे काही झाले नाही. उलट उद्धव यांनी मतदारांना भावनिक साद घातली. िवधानसभेवर भगवा फडकवण्याचे बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. त्यासाठी तुमचे हे प्रेम असेच कायम राहू द्या, असे भाविनक आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.
पवारांकडून उद्धव यांचे कौतुक
राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांनी उद्धव यांचे रविवारी कौतुक केले. मंत्रालय वार्ताहर संघातर्फे वार्तालापात ते म्हणाले, शिवरायांचे नाव घेऊन शिवसेना मते मिळवत असल्याचे मोदींना वाटते. पण हा गैरसमज आहे. शिवरायांचे नाव घेतानाच उद्धव पक्षवाढीसाठी कष्ट घेत आहेत. लोकसभेतील यशात शिवसेनेचाही वाटा आहे.

तुमच्या वाडवडिलांनी इथे रक्ताचे पाणी केले - राहुल
नागपूर - लोकांनी गाळलेल्या घामातून महाराष्ट्र उभा ठाकला आहे. तुमचे वाडवडील, पूर्वजांनी रक्ताचे पाणी केले आहे. पण दुसऱ्या पक्षाचे लोक इथे काहीच झाले नाही म्हणत आहेत. खरे तर राज्यातील जनतेला ते तुम्ही ६० वर्षांत काहीच केले नाही, असे म्हणत आहेत, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी भाजपवर टीका करतानाच जनतेला भावनिक आवाहन केले.
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात राहुल यांची नागपुरातील रामटेकमध्ये सभा झाली. नरेंद्र मोदींवर हल्ला चढवताना ते म्हणाले की, विकासात महाराष्ट्र गुजरातच्या पुढे आहे. तरीही काही लोक तुम्हाला मागास म्हणत आहेत. महापुरुषांचे विचार अंगीकारण्याचे काम काँग्रेसने केले आहे, असेही राहुल म्हणाले.

मूठभरांच्या हातात देश नको
राहुल म्हणाले, कामगारांना पुढे आणण्याचे आमचे ध्येय आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी विमाने उडवावीत. भारत हा १०-१५ उद्योगपतींचा देश करण्याचा भाजपवाल्यांचा इरादा आहे. काँग्रेसने दिल्ली-मुंबई-हरियाणा काॅरिडोर केला. पण हे काम तुम्ही केल्याचे आम्ही म्हणतो. तुम्ही केलेल्या कामाचे श्रेय एक नेता घेतो आहे, हे लक्षात घ्या.