आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Number Of People Gather At Chaityabhoomi An Eve Of Mahaparinirvan Day

महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर उसळला भीमसागर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतीय संविधानाचे कर्ते, सामाजिक समतेचे प्रणेते, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 57 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शुक्रवारी लाखो अनुयायांनी वंदन केले. देशभरातून हजारो मैलांचा प्रवास करून चैत्यभूमीवर आलेल्या भीमसैनिकांच्या उपस्थितीने दादर परिसराला निळ्या जनसागराचे स्वरूप प्राप्त झाले होते.
दादर स्टेशनपासून चैत्यभूमीकडे जाणारे सारे रस्ते भल्या पहाटेपासून गर्दीने फुलून गेले होते. बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी अनुयायांनी रात्रीपासून रांगा लावल्या होत्या. शुक्रवारी सकाळी ही रांग चार कि.मी. लांब वरळीपर्यंत गेली होती. गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी समता सैनिक दलाचे जवान झटत होते. शुभ्र साड्या परिधान केलेल्या दर्शन रांगेतील महिलांची उपस्थिती लक्षवेधी होती. चैत्यभूमीवर बाबासाहेबांना वंदन केल्यानंतर अनेकांची पावले इंदू मिलकडे वळत होती. स्मार्टफोनमध्ये इंदू मिलचे छायाचित्र काढताना अनेक जण दिसले. गटागटाने आलेले तरुण मिलसमोर जोरजोरात घोषणा देत होते.
निवडणुका तोंडावर आल्यामुळे चैत्यभूमी परिसरात बॅनरबाजीला ऊत आला होता. बाबसाहेबांना वंदन करणारी सर्व पक्षांची बॅनर्स होती. कामगार संघटना, यांच्या कामगारांचे विविध स्टॉल्स होते.
राजकीय पक्षांची पोस्टरबाजी
शिवाजी पार्कमध्ये राष्‍ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, रिपाइं, समाजवादी आणि भारिप यांनी मोठमोठे स्टॉल लावले होते. बहुजन समाज पक्षाने शाहू, फुले आणि आंबेडकर यांचे लावलेले मोठे कटआऊट लक्ष वेधून घेत होते. मुंबईतील अनुयायी बस, ट्रकने आले होते. त्यामुळे निळे झेंडे लावलेल्या हजारो वाहनांचा दादर परिसराला अक्षरश: वेढा पडला होता.
हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी
दरवर्षीप्रमाणे यंदाही चैत्यभूमी आणि शिवाजी पार्कमधील भीमसागरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. मुंबईचे पालकमंत्री जयंत पाटील आणि गृहनिर्माण राज्यमंत्री सचिन अहिर यांनी शासनाच्या वतीने पुष्पवृष्टी केली.