आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाजप महाराष्ट्र निवडणूक प्रभारीपदी मोदी-शहांचे विश्वासू ओम माथूरांची वर्णी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: राज्यसभेचे खासदार ओम माथूर)
मुंबई- महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका दोन महिन्यावर येऊन ठेपल्या असताना भाजपने महाराष्ट्राच्या प्रभारीपदी खासदार ओम माथूर यांची नियुक्ती केली आहे. माथूर हे राजस्थानचे असून ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे मोदी-शहा जोडगळीने सध्याचे महाराष्ट्र प्रभारी राजीवप्रताप रूडी यांना मोक्याची क्षणी हटवले आहे.
ओम माथूर हे मोदींसह शहांचे खास मानले जातात. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना माथूर हे गुजराजतचे प्रभारी होते. या काळापासून मोदी-शहांचे माथूर यांच्याशी सख्य होते. कुख्यात सोहराबुद्दीन बनावट पोलिस चकमक प्रकरणी माथूर यांचे नावही पुढे आले होते. असे असले तरी माथूर हे अभ्यासू, चाणाक्ष व आक्रमक असल्याचे सांगितले जाते. त्यामुळेच त्यांची मोदींशी नाळ जुळली. आता याच त्यांच्या कर्तबगारीमुळे मोदींनी त्यांच्याकडे निवडणुकीच्या तोंडावर महाराष्ट्रासारख्या महत्त्वाच्या राज्याचे प्रभारीपद सोपवले आहे.
महाराष्ट्रातील विधानसभेसाठी कोणतेही कसर राहू नये व शहा यांच्या व्यवस्थापनाला माथूरसारख्या विश्वासू व अभ्यासू प्रभारीपदाची साथ लाभल्यास आपल्यावरील सगळा भारच कमी होईल असे शहांना वाटत आहे. मुंबईत गुजराती लोकांची संख्या मोठी आहे. शिवसेनेला मुंबईत शह द्यायचा असेल तर सर्वप्रकारचे डावपेच आखावे लागतील यात माथूर हे काम चोख बजावतील असे शहांना वाटत आहे.

सध्याचे प्रभारी राजीवप्रताप रुडी यांच्याकडे महाराष्ट्राची जबाबदारी गेली काही वर्षे होती. पण शांत स्वभावाच्या रूडींना आक्रमक मोदी-शहांसोबत काम करणे कठीण जात आहे. महाराष्ट्राचे प्रभारी असताना त्यांनी विशेष कामगिरी केली नसल्याचे पक्ष म्हणणे आहे. रूडी हे मुंडे म्हणेल त्याच निर्णयाच्या सूरात सूर मिसळायचे अशी चर्चा असायची. पण आता मुंडे नाहीत आणि अशा परिस्थितीत आक्रमक व विश्वासू अशी व्यक्ती मोदी-शहा जोडीला हवी होती.
रूडी बिहारचे आहेत. मोदींनी आपल्या मंत्रिमंडळात रूडींना घेतले नव्हते. मुख्तार अब्बास नख्वी, शाहनवाज हुसेन यांच्यासह रूडी यांच्यासारख्यांना मोदींनी मंत्रिमंडळाच्या बाहेर ठेवण्यात यश मिळवले होते. शरद यादव व नितीशकुमार यांच्याशी ज्या ज्या भाजपमधील नेत्यांची जवळीक होती किंवा आहे अशांना मोदींनी हाताच्या अंतरावर ठेवले आहे. आगामी काळात या त्रिकुटाला संधी मिळेल असे सांगितले जात असले तरी बिहारमधील विधानसभेच्या निवडणुका पुढच्या वर्षी होत आहेत. त्यानंतरच मोदी याबाबत विचार करू शकतील.