आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • On 31 December, Pub, Restaurant, Bar Not Open After 12 In Mumbai

मुंबईत 31 डिसेंबरला पब, रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत खुले ठेवण्यास मनाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नव्या वर्षाच्या स्वागताचे काउंटडाऊन सुरू झाले असून मायानगरी मुंबईही थर्टीफर्स्टच्या नाइटचा जल्लोष साजरा करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी मुंबई पोलिसांनीही कंबर कसली आहे. त्यासाठी चार दिवस आधीपासूनच दीड हजारांवर मद्यपी वाहनचालकांवर कारवाई केली आहे. मात्र, पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचे प्रकार आणि सुरक्षेच्या कारणावरून पब, रेस्टॉरंट, बार पहाटेपर्यंत खुले ठेवण्यास मनाई केली आहे. त्यामुळे रात्री यंदा दीडनंतरच या रात्रीची धुंदी उतरण्यास सुरुवात होईल.
‘थर्टीफर्स्ट’ साजरा करण्यासाठी मुंबईकर मोठ्या संख्येने कोकणात जातात. तसेच दक्षिण आणि पश्चिम मुंबईतील गिरगाव, बँडस्टँड, मरीन लाइन्स, जुहू, नरिमन पॉइंट येथेही तरुणाई मोठ्या संख्येने गर्दी करत असते. त्यामुळे रात्री कोणताही अनुचित प्रकार घडू नये, विशेषत: महिलांच्या सुरक्षेबाबत दक्ष राहण्यासाठी पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिस ठाण्यांना कडक सूचना दिल्या आहेत. रात्रभर गस्त घालण्यासाठी पोलिसांची भरारी पथके तयार ठेवण्यात आली आहेत.
31 जानेवारीच्या रात्री अमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे गोव्याच्या सीमेवरील सर्व नाक्यांवर महाराष्‍ट्रात येणा-या वाहनांची कसून तपासणी करण्यात येत आहे. अमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी नायजेरियन नागरिकांवर पोलिस विशेष लक्ष ठेवून आहेत. खबरदारी म्हणून पोलिसांनी मद्यपी वाहनचालकांविरुद्ध सुरू केलेली मोहीम 1 जानेवारीपर्यंत चालवली जाणार आहे. या रात्री वाहनचालक मद्यपान केलेला आढळल्यास त्यांना दुस-या दिवशी पोलिस उपायुक्तांसमोर हजर करण्यात येणार आहे. त्यामुळे रात्रभर गस्त घालून सकाळी वाहनचालकांना उपायुक्तांसमोर हजर करण्याची कसरत पोलिसांना करावी लागणार आहे.
बेस्ट, लोकल रात्रभर सुरू
नववर्षाच्या स्वागताला पोलिसांनी काही प्रमाणात लगाम घातला असला तरी पश्चिम रेल्वे आणि बेस्टने मात्र उदार धोरण स्वीकारले आहे. थर्टीफर्स्ट साजरा केल्यानंतर घरी जाण्यासाठी वाहन उपलब्ध नसते. त्यामुळे पश्चिम रेल्वे रात्रभर लोकल सुरू ठेवणार असून ‘बेस्ट’च्या बसेसही दक्षिण मुंबईत रात्रभर धावणार आहेत.
हॉटेलचालक नाराज
थर्टीफर्स्टच्या नियोजनासाठी हॉटेलचालकांनी कोट्यवधींची गुंतवणूक केली आहे. पण रात्री दीडपर्यंतच हॉटेल्स खुली ठेवता येणार असल्यामुळे हॉटेलचालकांचे मोठे नुकसान होणार असल्याचा दावा आहार संघटनेच्या शशिकांत शेट्टी यांनी केला आहे.