मुंबई - सात फेब्रुवारी रोजी राज्याचे देवेंद्र फडणवीस सरकार १०० दिवस पूर्ण करीत आहे. या पार्श्वभूमीवर भाजपच्या राज्यातील सर्व मंत्र्यांना रिपोर्ट कार्ड तयार करण्यास सांगण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान
नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष
अमित शहा स्वतः मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड तपासणार असल्याने मंत्र्यांची चांगलीच तारांबळ उडालेली आहे. रिपोर्ट कार्ड हिंदीत तयार करण्याची अट घालण्यात आल्याने अधिकार्यांनाही तारेवरची कसरत करावी लागत आहे.
सूत्रांनी सांगितले, मुख्यमंत्र्यांच्या स्वतःकडील खात्यांच्या कामगिरीचा अहवाल तयार करण्याचे काम अधिकार्यांवर सोपवले असून अन्य मंत्र्यांनाही कामकाजाचा अहवाल देण्यास सांगितले आहे. अनुभवी मंत्र्यांनी अहवाल पूर्णत्वास आणले असून नवीन मंत्र्यांसमोर मात्र हे आव्हानच उभे राहिले आहे. एवढेच नव्हे तर हे अहवाल दिल्लीला पाठवावयाचे असल्याने हिंदीतही तयार करण्यास सांगितले आहेत.
याबाबत एका वरिष्ठ मंत्र्याच्या ‘ओएसडी’ने सांगितले, ‘आम्हाला मराठी आणि हिंदीमध्ये अहवाल तयार करावयाचा आहे. मात्र याबाबतचा फॉर्म्युला आमच्याकडे नसल्याने तो कसा तयार करावा असा प्रश्न पडला आहे. तुमच्याकडेच एखाद्या मंत्र्याचा अहवाल असेल तर आणून द्या,’ असेही या अधिकार्याने प्रस्तुत प्रतिनिधीला सांगितले.
जाहिरातींचा धडाका
सरकारचे १०० दिवस साजरे करण्यासाठी सरकार जाहिरात मोहीम राबवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. टीव्ही, रेडिओ आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन १०० दिवसांत काय काम केले ते सांगणार आहे. मेक इन महाराष्ट्र आणि सेवा हमी विधेयकासह, बदल्यांचे विकेंद्रीकरण, न्यायवैद्यक दुष्काळग्रस्त शेतकर्यांना घोषित केलेली मदत यावर जाहिरातीत भर दिला जाणार आहे. विशेष म्हणजे या जाहिरातींवर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेच छायाचित्र लावले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.