आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुटुंबाला कार्डरूपात एकच जात प्रमाणपत्र, चार महिन्यांत योजना होणार सुरु

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : राज्यमंत्री दिलीप कांबळे
मुंबई - रेशन कार्डप्रमाणे संपूर्ण कुटुंबासाठी स्मार्ट कार्डरूपात एकच जात प्रमाणपत्र देण्याची योजना सामाजिक न्याय विभागाने आखली आहे. आगामी ४ महिन्यांत ती सुरू करण्यात येईल, अशी माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली.

सध्या कुटुंबातील प्रत्येकाला स्वतंत्र जात प्रमाणपत्र काढावे लागते. पुरावे म्हणून विविध कागदपत्रेही गोळा करावी लागतात. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना प्रवेश व नोकरीसाठी व राजकारण्यांना आरक्षित मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास जातपडताळणी आवश्यक असते. आता जातपडताळणी प्रमाणपत्राची आवश्यकताच राहणार नाही.

याबाबत कांबळे म्हणाले, शिधापत्रिकेत जशी सर्व सदस्यांची नावे एकत्र असतात आणि नवीन सदस्य आल्यानंतर त्यात नाव जोडले जाते तसेच जातप्रमाणपत्र देण्याचा विचार आहे. स्मार्ट कार्डच्या रुपातील या प्रमाणपत्राची पडताळणी करण्याची गरज नसेल.

हे स्मार्ट कार्ड संगणकात टाकल्यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांची नावे समोर येतील आणि कोठूनही ही माहिती तपासून पाहाता येईल. त्यामुळे वेळेची बचतही होणार आहे.

पहिल्यांदा एससीसाठी स्मार्ट कार्ड
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेला सहमती दर्शवली आहे. कॅबिनेट बैठकीत प्रस्तावाला मान्यता मिळाल्यानंतर विधिमंडळात चर्चा होईल. त्यानंतर योजना सुरू करण्यात येईल. सध्या ही योजना फक्त अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आहे. ही लोकसंख्या राज्यात १३ टक्के असून, त्यांना याचा फायदा होईल, असे कांबळे म्हणाले.

असे असेल स्मार्ट कार्ड
कुटुंबप्रमुखाच्या नावे कार्डरूपातील प्रमाणपत्र असेल. कार्ड मशीनमध्ये टाकताच कुटुंबातील सदस्यांची नावे, वय संगणकावर दिसेल. नव्या सदस्याचे नाव जोडणे शक्य असून लग्नानंतर मुलीचे नाव सासरच्या कार्डमध्ये जोडताच माहेरच्या कार्डमधून आपोआप वगळले जाईल. त्याच्या पडताळणीची गरज नसेल.