आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • One Mla, One School, State Govt May New Scheme Model School

मराठी शाळांसाठी शिक्षणमंत्र्यांची 'एक आमदार एक शाळा' योजना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- राज्यात मराठी शाळा अखेरच्या घटका मोजत असतानाच शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी 'एक आमदार एक शाळा' योजना राबविणार असल्याची विधानसभेत घोषणा केली. यापुढे एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही. त्या वाचविण्यासाठी सरकार पुढाकार घेईल, अशी ग्वाहीही तावडे यांनी दिली. राज्यातील प्रत्येक आमदाराने आपल्या मतदारसंघातील एक शाळा दत्तक घेऊन ती मजबूत, बळकट करीत ‘मॉडेल स्कूल’ म्हणून भरभराटीला आणावी, असे आवाहन त्यांनी सर्व आमदारांना केले.
कॉन्व्हेंट आणि इंग्रजी माध्यमाच्या खाजगी शाळांचा सुळसुळाट झाल्याने राज्यात मुख्यत: शहरी भागात मराठी शाळा अखेरच्या घटका मोजत आहेत. याचे पडसाद विधानसभेत उमटले. शिक्षणाच्या दुरवस्थेबाबत चर्चा सुरू असतानाच अनेक सदस्यांनी मराठी शाळांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. त्या वाचवा, जगवा, त्यासाठी ठोस धोरण तयार करा, अशी मागणी केली होती. या चर्चेला उत्तर देताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी यापुढे सरकार एकही मराठी शाळा बंद पडू देणार नाही, असे ठाम आश्‍वासन दिले. राज्यात 80 ते 82 टक्के मराठी शाळा आहेत. पण शहरी भागात मराठी शाळा बंद पडू लागल्या आहेत. याबाबत चिंता व्यक्त करतानाच या शाळा वाचवाव्याच लागतील, मजबूत कराव्या लागतील. त्यासाठी सरकार पुढाकार घेईल आणि ठोस उपाययोजना करील, असेही ते म्हणाले.
ही तर आपल्या सर्वांचीच जबाबदारी- मराठी शाळा वाचवणे ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी फक्त सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले तर उद्देश नक्कीच साध्य होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गावांच्या विकासासाठी देशातील प्रत्येक खासदाराने एक गाव दत्तक घेण्याची योजना मांडली होती. तेच मॉडेल राज्यात राबवूया. राज्यातील प्रत्येक आमदाराने एक शाळा घेऊन तिचा विकास केला तर मराठी शाळांच्या चिंतेचा विषय संपेल, त्या बळकट होतील आणि त्या योजनेसाठी सरकार सर्वतोपरी मदत करेल, असे तावडेंनी जाहीर केले.