आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IS साठी भरती करणारा इम्रान गजाआड, घरातून झोपेतच घेतले ताब्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वैजापूर/ मुंबई/ नवी दिल्ली- प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याच्या शंकेने एनआयएने देशभरात सुरू केलेली इसिसच्या हस्तकांची धरपकड शनिवारीही सुरूच होती. एनआयए व महाराष्ट्र एटीएसने शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुरातून इम्रान मोहजम खान पठाणला (२५) जेरबंद केले, तर द. मुंबईच्या माझगावात महंमद हुसेन खान ऊर्फ जमीलला अटक केली. हैदराबादेत रिझवान अली व बंगळुरूत रफिकला अटक केली. वैजापुरच्या कारवाईमुळे इसिसचे जाळे मराठवाड्याच्या ग्रामीण भागापर्यंत पसरल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रातील हे दोघे जनूद-उल-खलिफा-ए-हिंद या अतिरेकी संघटनेशी संबंधित असून इसिस या दहशतवादी संघटनेसाठी ते तरुणांची भरती करत होते, असा एनआयचा संशय आहे. वैजापूरचा इम्रान ‘जनूद’चा नायब आमिर (सहायक कमांडर) असल्याचे सांगितले जाते.

एनआयए आणि एटीएसचे पथक शनिवारी सकाळीच वैजापुरात धडकले. सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांनी सापळा रचून बर्डी मशीद परिसरातील घरातून इम्रान पठाणला झोपेतच ताब्यात घेतले. या पथकात ७ ते ८ जणांचा समावेश होता. पथकाने त्याची कसून चौकशी केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करून स्थलांतर परवानगी घेऊन पथक मुंबईकडे रवाना झाले. या पथकाने त्याच्या घरातून ३ ते ४ मोबाइल संच, २ लॅपटॉप व काही संशयित वस्तू जप्त केल्या आहेत. इम्रान हा इसिसचा कमांडर असल्याचे बोलले जात असून २६ जानेवारीला देशात घातपात घडविण्याचा उद्देश त्याच्या अटकेमुळे उधळून लावण्यात यश आल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे.

एनआयएने मुंबईच्या मुंब्रा भागातून जेरबंद केलेल्या हस्तकाने दिलेल्या माहितीवरून एटीएस व एनआयएच्या पथकाने शनिवारी ही कारवाई केली. ही कारवाई करतांना कमालीची गुप्तता यंत्रणेने बाळगली होती. त्यामुळे दुपारपर्यंत या कारवाईची भनकही कोणाला लागलेली नव्हती.
२०१५ पासून इम्रानवर पाळत - एटीएस इम्रानवर २०१५ पासूनच पाळत ठेवून होते. तो कुठे जातो, कोणाशी भेटतो, सोशल मीडियावर कोणाच्या संपर्कात असतो याची खडान‌्खडा माहिती एटीएस सातत्याने गोळा करत होते. अशीच पाळत अन्य १३ जणांवरही होती. या सगळ्यांना देशात ‘खळबळजनक हल्ले’ करण्याच्या सूचना मिळाल्यानंतर त्यांच्या अटकेचा निर्णय घेण्यात आला.
पुढील स्‍लाइडवर क्‍लिक करून वाचा..,
मोठ्या हल्ल्याची होती तयारी..,
हार्डवेअरतज्ज्ञ ते ‘नायब आमिर’..,
लॅपटॉप दुरुस्तीची थाप मारून एनआयने आवळल्या मुसक्या..,
ट्रेनिंग कॅम्पच्या जागेच्या शोधात..,
लॅपटॉपमध्येच डोके खुपसून बसलेला असायचा इम्रान.