आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत आणखी एक तरुणी नराधमांची ‘शिकार’

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - शक्ती मिलमध्ये महिला छायाचित्रकारावर सामूहिक बलात्कार करणार्‍या पाच आरोपींपैकी तीन जणांनी आपल्यावरही लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार एका 18 वर्षीय युवतीने केली आहे. 31 जुलै रोजी या नराधमांनी आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तिने ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्यात नोंदवली.

छायाचित्रकार तरुणीवरील बलात्कार प्रकरणी पोलिसांनी विजय जाधव, सलीम अन्सारी, मोहंमद कासम बंगाली, सिराज रहमान खान व एका अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे. दुसर्‍या पीडीत तरुणीने त्यांच्यापैकी अन्सारी, बंगाली व संबंधित अल्पवयीन आरोपीला ओळखले आहे. ही तरुणी महालक्ष्मी परिसरात काम करते.


पीडितेला अश्लील क्लिप दाखवली
शक्ती मिल परिसरात नराधमांनी पीडित महिला छायाचित्रकाराला बलात्कारापूर्वी अश्लील क्लिप दाखवली होती. पीडितेने पुरवणी जबाबामध्ये ही बाब पोलिसांसमोर उघड केली. पाचपैकी एका आरोपीच्या मोबाइलमध्येच ही क्लिप दाखवण्यात आली होती. आरोपींनी तिच्याबरोबर विकृतपणे अत्याचार केल्याचेही तिने सांगितले आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणात 377 कलमही लावले आहे. तसेच हा सुनियोजित कट असल्याचे स्पष्ट झाल्याने, 120 ब ही लावल्याचे एका अधिकार्‍याने सांगितले.

दोन पीडितांच्या उपचारांचा खर्च प्रदान
छायाचित्रकार तरुणीवरील उपचारांचे 1 लाख 85 हजार 859 रुपये मुख्यमंत्री निधीतून मंगळवारी जसलोक रुग्णालयाला देण्यात आले. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यापूर्वीच तशी घोषणा केली होती. तसेच, दोन महिन्यांपूर्वी पिझ्झा डिलिव्हरी बॉयच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वरळी येथील तरुणीच्या उपचारांचा 93 हजार 509 रुपये खर्चही देण्यात आला. बलात्काराचा प्रयत्न अयशस्वी झाल्याने तिच्यावर हल्ला चढवला होता.

पुढे काय
आरोपींच्या मोबाइलमध्ये अश्लील क्लिप मिळाल्यास आयटी कायद्यातील कलमे लावून आरोपींना कमाल शिक्षा मिळण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न.


प्रियकराला बांधून प्रेयसीवर अत्याचार
31 जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजता ती 18 वर्षीय तरुणी आपल्या प्रियकरासमवेत शक्ती मिलमध्ये गेली होती. दोघांचेही दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. परंतु, तरुणीच्या घरच्यांना ते मान्य नव्हते. दोघेही मिलच्या परिसरात फिरत असताना आरोपींनी दोघांनाही धमकावले. तिच्या प्रियकराला दुपट्टय़ाने बांधले व तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी आपल्या आणखी दोघा मित्रांना घटनास्थळी बोलावले. या दोघांनीही तिच्यावर बलात्कार केला. या घटनेमुळे घाबरलेली संबंधित युवती आपल्या प्रियकरासमवेत छत्तीसगडला पळून गेली. त्या रात्री ही युवती घरी न परतल्यामुळे तिच्या कुटुंबीयांनी भांडूप पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तेव्हापासून पोलिस त्यांचा ठावठिकाणा शोधत होते. अखेर दोन दिवसांनंतर ही युवती परतल्यानंतर तिने भांडूप पोलिसांना हा प्रसंग सांगितला. त्यानंतर हे प्रकरण तपासासाठी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्याकडे हस्तांतरित करण्यात आले.