आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वन रँक वन पेन्शन आंदोलन, माजी सैनिकांचा अल्टिमेटम, संघर्ष पोहोचला शिगेला

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - "वन रँक वन पेन्शन'चा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने लवकरात लवकर घ्यावा, अन्यथा आगामी २८ आॅगस्ट रोजी होणाऱ्या १९६५ युद्धाच्या सुवर्णजयंती कार्यक्रमावर देशातील लाखो माजी सैनिकांकडून बहिष्कार घालण्यात येईल, असा इशारा आंदोलनाचे नेते ब्रिगेडिअर सुधीर सावंत यांनी गुरुवारी दिला आहे.

यंदाच्या स्वातंत्र्यदिनी अर्थात १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून दिलेल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी "वन रँक वन पेन्शन'ची घोषणा करतील, अशी आंदोलक सैनिकांची अपेक्षा होती; परंतु ती फोल ठरल्याने माजी सैनिकांमध्ये कमालीचे असंतोषाचे वातावरण आहे. अलीकडे निवृत्त झालेल्या सैनिकांना भरघोस निवृत्तिवेतन मिळते. मात्र, १९६५ च्या युद्धात पाकिस्तानशी दोन हात केलेल्या व आता ७० ते ८० वर्षे वयोमान असलेल्या या शूर सैनिकांना आणि शहिदांच्या विधवांना तुटपुंजे वेतन का? असा सवाल या माजी सैनिकांचा आहे.
११ आॅगस्ट रोजी दिल्लीतील जंतरमंतर येथे माजी सैनिकांच्या सत्याग्रहावर पोलिसांनी लाठीमार केला. १५ आॅगस्ट रोजी लाल किल्ल्यासमोर सुद्धा या माजी सैनिकांना पोलिसांच्या लाठ्या खाव्या लागल्या. दबावतंत्र वापरून मोदी सरकारने या माजी सैनिकांचा घोर अपमान केला आहे, असा आरोप सावंत यांनी केला आहे.
मोदींनी निवडणुकीपूर्वी वन रँक वन पेन्शनचे आश्वासन दिले होते. मोदी बिहारसाठी १ लाख २५ हजार कोटी रुपये देतात आणि युद्धात मर्दूमकी गाजवलेल्या या शूर सैनिकांसाठी केवळ ८ हजार कोटी देताना का हात अखडता घेतात ? असा सवाल या सैनिकांनी केला आहे.
सातव्या वेतन आयोगाने तफावत वाढणार
केंद्राच्या सेवेतील कर्मचाऱ्यांना लवकरच सातवा वेतन आयोग लागू होणार आहे, पण त्याचा लाभ या वयोवृद्ध माजी सैनिकांना मिळणार नाही. अलीकडे निवृत्त झालेल्या सैनिकांना मात्र तो मिळणार आहे. सातव्या वेतन आयोगाने या सैनिकांमधील निवृत्तिवेतनातील तफावत आणखी रुंदावणार आहे. त्यामुळे वन रँक वन पेन्शनच्या लढ्याला महत्त्व आले अाहे.
लवकरच पंतप्रधान माेदींशी भेट
वन रँक वन पेन्शनच्या मागणीसाठी मागील ६६ दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतर मैदानावर आंदोलनास बसलेले माजी सैनिक पुढच्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्याची शक्यता आहे. इंडियन एक्स सर्व्हिसमन मूव्हमेंटचे अध्यक्ष मेजर जनरल सतबीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधानांसोबतच्या बैठकीची तारीख निश्चित झाली नाही. मात्र, २३ किंवा २४ ऑगस्ट रोजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर माजी सैनिकांची भेट घेणार आहेत. त्यानंतरच पंतप्रधानांची भेट ठरेल. दरम्यान, युनायटेड फ्रंट ऑफ रिटायर्ड कर्नल अनिल कौल यांच्या मते, २४ ते २६ ऑगस्टदरम्यान पंतप्रधान-माजी सैनिक भेट होण्याची शक्यता आहे. या मुद्द्यावर लष्करप्रमुख जनरल दलबीर सिंह यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. यापूर्वी मंगळवारी पंतप्रधान कार्यालयाचे प्रधान सचिव नृपेंद्र मिश्रा यांनी आंदोलक माजी सैनिकांशी चर्चा केली आणि १० दिवसांपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची विनंतीही केली. दरम्यान, काही संघटनांनी त्यांची विनंती मान्य केली होती. मात्र, काही माजी सैनिक वैयक्तिकरीत्या आमरण उपोषणाला बसले आहेत.