आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्र्यांना आई भवानीची शपथ; दिव्यांगांना एक हजाराचा भत्ता, बच्चू कडूंच्या प्रश्नावर बडाेलेंचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘आई भवानीची शपथ घ्या. माझा तुमच्यावर विश्वास नाही,’ असे आमदार बच्चू कडू यांनी समाजकल्याणमंत्री राजकुमार बडोले यांना स्पष्टपणे सांगितले. त्यानंतर बडोले यांनी एका महिन्यात दिव्यांगांचे प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. ‘त्यांचा भत्ता हजार रुपये करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. कृपया विश्वास ठेवा,’ असे मंत्र्यांनी सांगितले. 
 
दिव्यांगांच्या विविध प्रश्नांवरून बच्चू कडू, डॉ. अनिल बोंडे, विनायकराव जाधव यांनी शुक्रवारी विधानसभेत लक्षवेधी सूचना उपस्थित केली. ‘राज्यातल्या ३० लाख दिव्यांगांचा प्रश्न आहे. त्यांचा भत्ता सहाशे रुपयांवरून हजार रुपयांवर नेण्याची घोषणा यापूर्वी तीनदा झाली, पण अजून निर्णय नाही. त्यामुळे मंत्र्यांनी शपथ घेऊन सांगावे,’ अशी आर्जवे कडू यांनी केली. त्यावर बडोले म्हणाले, राज्यात ४ लाख ३ हजार ९३३ दिव्यांग लाभार्थी आहेत. त्यांचा भत्ता हजार रुपयांवर नेण्याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महिनाभरात कार्यवाही पूर्ण होईल. यासाठी राज्याच्या तिजोरीवर २५ कोटींचा भार येणार आहे.’ दरम्यान, दिव्यांगांचा तीन टक्के निधी नियंत्रण आणि खर्च याबाबत अशासकीय सदस्यांची जिल्हा आणि तालुकास्तरावर समिती नेमण्याचे आदेश देऊनही अंमलबजावणी झाली नाही, याकडेही कडू यांनी लक्ष वेधले.  
 
आमदारांचे पगार वाढले, परंतु दिव्यांगांना आर्थिक लाभासाठी ताटकळत राहावे लागते. शासकीय आणि अनुदानित वसतिगृहात दिव्यांगांच्या तीन टक्के जागा राखीव ठेवणे, गृहनिर्माण प्रकल्पात दिव्यांगांना २ टक्क्यांएेवजी ३ टक्के आरक्षण करणे, रोजगारासाठी दिव्यांगांना दोनशे चौरस मीटर शासकीय भूखंड देण्याच्या शासन निर्णयाचा लाभ न देणे अशा मागण्या कडू यांनी या वेळी सादर केल्या.

बनावट दिव्यांग   
‘दिव्यांग प्रमाणपत्र ऑनलाइन यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार असल्याने ५० ते ६० टक्के दिव्यांगांची प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. मात्र, त्याच वेळी हजारो बनावट व्यक्तींना दिव्यांग प्रमाणपत्रे वितरित होत आहेत. याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर फक्त गुन्हे दाखल करून चालणार नाही, तर ‘केंद्रीय अपंग व्यक्ती समान संधी संपूर्ण सहभाग अधिनियम १९९५’नुसार कारवाई झाली पाहिजे,’ अशी मागणी बच्चू कडू यांनी केली.
बातम्या आणखी आहेत...