आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांदा कडाडला! मागणीच्या तुलनेत पुरवठा घटल्याने भाव वधारले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली/ लासूर स्टेशन- दोन वर्षांपूर्वी प्रचंड भाववाढीमुळे सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणणारा आणि १९९८ मध्ये दिल्ली सरकार पाडण्यास कारणीभूत ठरणारा कांदा या वर्षी राष्ट्रीय चिंतेचा विषय ठरू पाहत आहे. मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर घटल्याने देशातील सर्वात मोठी कांदा आडत असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत तीनच दिवसांत कांद्याच्या ठोक भावात ३० टक्के वाढ झाली आहे. परिणामी आधीच भडकलेल्या महागाईत आणखी तेल ओतले जाण्याची चिन्हे आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील लासूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार समितीतही बुधवारी कांद्याचे ठोक भाव ३५०० रुपये प्रतिक्विंटलवर पोहोचले आहेत.
पावसाळ्यामुळे गुणवत्तेवर परिणाम व आवक घटल्याने जुलै महिन्यात कांद्याचे भाव थोडे जास्तच असतात. परंतु यावर्षीच्या जुलैमध्ये कांद्याने भाववाढीची सर्वोच्च पातळी गाठली.बुधवारी लासलगावात कांद्याचा प्रतिक्विंटल ठोक भाव २५५० रुपये होता. नोव्हेंबर २०१३ नंतरचा हा सर्वाधिक भाव आहे. त्या वर्षी कांद्याचे किरकोळ भाव १०० ते १२५ रुपये किलोवर पोहोचले होते. त्यावरून लोकांनी मोठे आंदोलन केले होते.
नव्या हंगामाचा कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात येतो; परंतु यावर्षी नोव्हेंबरच्या आधी नवा कांदा येण्याची शक्यता नाही.

भाववाढ
13 दिवसांत 55% महिनाभरात 70%
लासलगावात गेल्या १३ दिवसांत कांद्याचे भाव ५५ टक्क्यांनी वाढले. १० जुलै रोजी प्रतिक्विंटल ठोक भाव १६५० रुपये होता. बुधवारी तो २५५० रुपये झाला. २७ जून रोजी केंद्राने कांद्याच्या निर्यातदरात वाढवल्याने महिनाभरात भावात ७० टक्के वाढ झाली आहे.

अवकाळी पाऊस, गारपिटीचा फटका
या वर्षीच्या मार्च- एप्रिल महिन्यांत झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे कांदा पिकाची मोठ्या प्रमाणावर नासाडी झाली. त्यामुळे रब्बीत कांद्याचे अपेक्षित उत्पादन झाले नाही. जो कांदा हाती आला त्याची गुणवत्ताही चांगली नाही.

किरकोळ भाव 35 रुपयांवर
कांद्याच्या ठोक भावामध्ये मोठी वाढ झाल्यामुळे देशभर किरकोळ बाजारात २० रुपये प्रतिकिलो मिळणारा कांदा ३५ ते ४० रुपये दराने विक्री होत आहे. आगामी आठवड्यात हे भाव आणखी भडकण्याची चिन्हे आहेत.

कांद्याचे उत्पादन 189 लाख टनच
यंदाच्या २०१४-१५ पीक वर्षात (जुलै-जून)१८९.२३ लाख टन कांदा उत्पादन अपेक्षित आहे. गेल्या वर्षी देशात १९४ लाख टन कांदा उत्पादन झाले होते.


शेतकऱ्यांकडे कांदा किती?
अवकाळी व गारपिटीने नुकसान झाले. बहुतांश शेतकरी एप्रिल-मेमध्येच कांदा विकतात. सध्या त्यांच्याकडे किती कांदा आहे, हे सांगणे अवघड आहे.
सोहनलाल भंडारी, अध्यक्ष, नाशिक कांदा व्यापारी असोसिएशन

राजकारण : कांदा भाववाढीने सरकारही खाली खेचले!
2013 - कांदा १०० रुपये किलोवर पोहोचल्याची किंमत शीला दीक्षित सरकारला सत्ता गमावून मोजावी लागली.

2010 - देशात प्रचंड कांदा तुटवडा. तेव्हा पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ‘गंभीर चिंतेचा’ विषय असे वर्णन केले होते.

1998- कांदा भाववाढीने दिल्लीत भाजपचे सुषमा स्वराज सरकार पायउतार केले. राजस्थानातही मुख्य मुद्दा.