आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याला प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान, पणनमंत्री देशमुखांचा अनुदान वाढीचा निर्णय हवेतच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा शासन आदेश निघाला आहे. बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यास प्रतिक्विंटल शंभर रुपये अनुदान देण्यात येणार आहे. अनुदानात वाढ करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे, तसा प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळासमोर मांडला जाईल, अशी ग्वाही पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी अधिवेशन काळात दिली होती. देशमुख यांची ही ग्वाही मात्र हवेत विरल्याचे शनिवारी काढलेल्या शासन निर्णयाने स्पष्ट झाले आहे.

कांद्याच्या दरात यंदा मोठी घसरण झाली होती. त्यामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्री केलेल्या कांद्यास प्रतिक्विंटल १०० रुपये अनुदान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. १ जुलै ते ३१ ऑगस्ट २०१६ या कालावधीत विक्री केलेल्या कांद्यास अनुदान देण्यात येणार आहे. एका शेतकऱ्यास दोनशे क्विंटलपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्यामुळे एका शेतकऱ्यास अधिकात अधिक दोन हजार रुपये मिळणार आहेत. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी या योजनेखाली अनुदान प्राप्त करण्यासाठी कांदा विक्री पट्टीसह सातबाराचा उतारा, बँक बचत खाते क्रमांक इत्यादींसह साध्या कागदावर ज्या बाजार समितीकडे कांद्याची विक्री केली असेल तिथे अर्ज करायचा आहे.    
 
मुंबई बाजार समितीत योजना लागू नाही:  मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळून राज्यातील सर्व बाजार समित्यांना सदर योजना लागू असणार आहे. सातबारा वडिलांच्या नावे व विक्री पट्टी मुलांच्या नावे असेल तर तसे शपथपत्र बाजार समितीकडे सादर करावे लागणार आहे. त्यानंतर सातबारा उतारा ज्यांच्या नावे असेल त्याच्या बँक खात्यात अनुदानाची रक्कम जमा होईल.  

४२ कोटी मिळणार   
राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान दिले. मात्र, याबाबतचा निर्णय हा हिवाळी अधिवेशनात घेण्यात आला. त्यानंतर त्यासंबंधीचा शासनादेश अर्थसंकल्पीय अधिवेशनात निघाला. त्यातही अनुदानास शेतकरी अपात्र व्हावेत यासाठी अनेक अटी घातल्या. परिणामी संबंध महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कांदा अनुदान म्हणून केवळ ४२ कोटी रुपये मिळणार आहेत.
 
बातम्या आणखी आहेत...