आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लॉटरी घोटाळा: जयंत पाटलांनी आरोप फेटाळले, कुलकर्णींचा दावा खोटा- अर्थमंत्री

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 2001 ते 2009 या कालावधीत महाराष्ट्र सरकारच्या ऑनलाईन लॉटरी विभागात तब्बल अडीच ते तीन लाख कोटींचा महाघोटाळा केल्याचा आरोप माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी केले होते. मात्र, जयंत पाटील यांनी कुलकर्णी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. माझ्या 15 वर्षाच्या मंत्रिपदाच्या कालावधीत राज्य सरकारचा 1 रूपयांचेही नुकसान अथवा महसूल बुडविला नाही असे स्पष्टीकरण जयंत पाटलांनी दिले आहे.
माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी मंगळवारी जयंत पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. मात्र, काल दिवसभर जयंत पाटील अथवा राष्ट्रवादीकडून याबाबत कोणतेही स्पष्टीकरण दिले नव्हते. जयंत पाटील यांनी मंगळवारी रात्री उशिरा स्पष्टीकरण दिले. आपण सध्या अमेरिकेत आहे. माझ्यावर झालेल्या आरोपांची माहिती, बातमी उशिरा समजली त्यामुळे प्रतिक्रिया देण्यास उशिर झाला असे सांगद जयंतरावांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले.
जयंत पाटील यांनी दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, मी दोन दिवसापूर्वीच अमेरिकेत आलो आहे. त्यामुळे महाराष्ट्रात माझ्याबाबत आलेल्या बातम्या समजायला उशीर झाला. मात्र, मी सर्व आरोप फेटाळून लावत आहे. माझ्या मंत्रिपदाच्या 15 वर्षाच्या कार्यकाळात कधीच राज्याचे नुकसान होऊ दिले नाही. कुलकर्णी यांनी केलेल्या आरोपांत कोणतेही तथ्य नाही. यासंदर्भात यापूर्वीच हायकोर्टात याचिका दाखल केली होती. लॉटरीची निविदा प्रक्रिया योग्य असल्याचे तेव्हा कोर्टाने सांगितले होते व त्यामुळेच ती याचिकाही फेटाळून लावली होती. आम्ही 2 अंकी लॉटरीसाठी तीन वेळा निविदा मागवल्या होत्या. त्यासाठी केवळ दोन-तीनच निविदा आल्या होत्या. त्यातील एकच पात्र ठरली. त्यामुळे नियमानुसार आम्ही संबंधित कंपनीला निविदा दिली होती. उलट संबंधित ऑनलाईन लॉटरीमुळे राज्याचा महसूल 15 कोटींवरून 300 कोटींपर्यंत गेला आहे. तर सोडतीची संख्या 3 हजारांवरून 30 पर्यंत खाली आली आहे असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांनी दिले आहे.
ऑनलाईन लॉटरी विभागाच्या संचालिका कविता गुप्ता या 7-8 वर्षे याच विभागात कशा काय चिकटून बसल्या होत्या या कुलकर्णी यांच्या आरोपाबाबत स्पष्टीकरण देताना जयंत पाटील यांनी म्हटले आहे की, कविता गुप्ता या सनदी अधिकारी आहेत. त्या सचिव दर्जाच्या अधिकारी असून लॉटरी आयुक्त म्हणून काम पाहत होत्या. सचिव व आयुक्त दर्जाच्या अधिका-याच्या बदलीचे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. त्यामुळे कविता गुप्ता यांच्या नियुक्तीवर मी भाष्य करणे संयुक्तिक होणार नाही. आज जगभरात ऑनलाईन किंवा छापील लॉटरी चालवल्या जातात. यातील अनेक देशात खासगी मुद्रणालयातून लॉटरीची छपाई केली जाते. अर्थ सचिव व लॉटरी आयुक्तांनी मुद्रणालयाच्या सुरक्षेबाबत आणि गुणवत्तेबाबत वेळोवेळी तपासणी केली आहे असे स्पष्टीकरण दिले आहे.
लॉटरी घोटाळ्याबाबत सत्ताधारी भाजप शांत-
दरम्यान, माजी सनदी अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी आरोप केल्यानंतर सत्ताधारी भाजपने याबाबत सावध भूमिका घेतली आहे. गरज भासल्यास चौकशी करता येईल असे मोघम व सरकारी उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी तर कुलकर्णी यांचे आरोप हास्यास्पद असल्याचे म्हटले आहे तर प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी जयंत पाटील यांच्यासारखा उच्चशिक्षित व सुसंस्कृत नेता स्वत: असे काही करेल असे वाटत नाही अशी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे वाचा, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, कुलकर्णींचा दावा खोटा...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)