आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ऑपरेशन लोटस\'ची तयारी, भाजपचे ज्येष्ठ नेते घेणार पराभूत मतदारसंघांचा आढावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- राज्यात भाजपचे पहिलेवहिले सरकार स्थानापन्न होऊन विश्वासदर्शक ठरावाची कठीण परीक्षाही उत्तीर्ण झाले. यथावकाश भाजपच्या मंत्रिमंडळाचाही विस्तार केला जाणार आहे. त्यामुळे आता भाजपच्या प्रदेश नेतृत्वाने संघटनात्मक बाबींकडे लक्ष देण्याचे ठरवले आहे. विधानसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात पक्षाचा पराभव झाला आहे तेथील सद्य:स्थितीचा आढावा घेत पराभवाची कारणे तपासली जाणार आहेत. मात्र, पराभूत मतदारसंघांच्या आढाव्याचा घाट म्हणजे एक प्रकारे "ऑपरेशन लोटस'ची पूर्वतयारी असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेच्या विशेष अधिवेशनानंतर सत्तेची घडी नीट बसत असल्याची खात्री पटताच भाजपच्या कोअर कमिटीने आता संघटनात्मक बाजूकडे लक्ष केंद्रित केले आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने आपल्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच शंभर आमदारांचा आकडा गाठत स्वबळावर चांगले यश संपादन केले. मात्र स्वबळावर सत्ता स्थापन करण्याची भाजपची संधी थोडक्यात हुकल्याची चुटपूट अजूनही पक्षनेत्यांना अस्वस्थ करत अाहे. भाजपने विधानसभेच्या तब्बल २५४ जागा लढवल्या होत्या. त्यापैकी १२२ जागांवर यश मिळाले, तर १३२ जागांवर पराभव पत्करावा लागला. अनेक ठिकाणी तर भाजपच्या उमेदवारांना निसटता पराभव स्वीकारावा लागला आहे. यापैकी बऱ्याच मतदारसंघांत पराभव होण्यामागे पक्षातल्याच स्थानिक नेत्यांचा आणि प्रमुख कार्यकर्त्यांचा हात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत. त्यामुळे पक्षसंघटनेतील या फुटीकडे गांभीर्याने लक्ष देण्याचा निर्णय भाजपच्या काेअर कमिटीने घेतला आहे.
दिवंगत केंद्रीय मंत्री भाजपचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांच्या स्मृतिनिमित्त रविवारी मुंबईत शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाजन यांच्या कन्या खासदार पूनम पत्नी रेखा महाजन यांनी स्वत: या स्पर्धेच्या नियोजनात पुढाकार घेतला होता.

तक्रारींची दखल घेणार
गेल्याअनेक दिवसांपासून भाजपच्या नव्या मंत्र्यांच्या अभिनंदनासाठी राज्याच्या विविध भागांतून स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांनी मुंबईत रीघ लावली आहे. या वेळी नेत्यांसमोर पराभूत मतदारसंघातील स्थानिक नेत्यांच्या तक्रारींचा पाढा वाचला गेला. या तक्रारींची संख्या अधिक असल्याने त्याकडे वेळीच लक्ष देण्याची गरज असल्याचे मतही भाजपच्या या ज्येष्ठ नेत्याने व्यक्त केले.
पराभवाची कारणमीमांसा करणाऱ्या अहवालानंतर दगाबाज नेत्यांवर कारवाई
राज्यातल्यापराभवाचा आढावा घेण्यासाठी भाजपच्या प्रमुख नेत्यांवर प्रादेशिक विभागनिहाय जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यासाठी विविध स्तरांवरील नेत्यांच्या समित्याही नेमण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या समित्या पक्षाचा पराभव झालेल्या मतदारसंघात जाऊन तेथील कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांच्या तक्रारी ऐकून घेतील पराभवाच्या कारणांचाही आढावा घेणार आहेत. या समित्यांनी दिलेल्या अहवालानंतर पुन्हा कोअर कमिटीत चर्चा होऊन पराभवासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती भाजपच्या एका राज्यस्तरीय नेत्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
भाजप उमेदवार पराभूत झालेल्या मतदारसंघाचा अाढावा घेण्याच्या माध्यमातून प्रदेश नेतृत्वाने एका दगडात दोन पक्षी मारण्याचा प्रयत्न चालवला आहे. एकीकडे पक्षाच्या या समित्या मतदारसंघाततील संघटनात्मक तक्रारी ऐकून घेतील. त्याचबरोबर राज्यात सत्ता टिकवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या बहुमताचा आकडा (१४५) गाठण्यासाठी कोणते मतदारसंघ "योग्य' आहेत याचाही अंदाज घेतला जाणार आहे. ज्या मतदारसंघात भाजपचा निसटता पराभव झाला आहे अशा ठिकाणची सद्य:स्थिती काय आहे हे अधिक बारकाईने तपासले जाणार आहे. या मतदारसंघात सध्याचा आमदार काेणत्या पक्षाचा आहे, त्याला आपल्या पक्षात घेण्याची संधी आहे का याचाही आढावा घेतला जाणार असल्याचे कळते. "ऑपरेशन लोटस'च्या माध्यमातून इतर पक्षातले काही आमदार फोडून त्यांना पुन्हा भाजपच्या तिकिटावर निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. या योजनेची पूर्वतयारी याच आढाव्याद्वारे केली जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. पक्षस्तरावर विभागीय समित्या नेमण्याचा पक्षनेतृत्वाचा विचार