मुंबई - गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस अपयशी ठरले आहेत, पोलिस महासंचालक संजीव दयाळ यांनी मुख्यमंत्र्यांना खिशात घातले आहे, असा आरोप विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी गुरुवारी विधानसभेत केला, तर काॅ. गोविंद पानसरे यांचे मारेकरी माहीत असूनही सरकार त्यांना अटक करत नसल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.
‘राज्याचा सुरक्षा आयोग व सुरक्षा परिषद यांची सात महिन्यांत बैठक झालेली नाही. यावरून हे सरकार कायदा सुव्यवस्थेबाबत गंभीर आहे का?’ असा प्रश्न विखे पाटील यांनी विचारला.
"आम्ही सत्तेत असताना एकनाथ खडसे आमची वारंवार लाज काढायचे. मात्र, अाता राज्यात महिलांवर बलात्कार करून खून होताहेत. २५ हजारांचे हप्ते घेऊन पोलिस विषारी दारूकांडात १०४ लोकांचे बळी जाऊ देतात. रस्त्यावर गँगवार भडकलेय. पुणे, नाशिक शहरांमध्ये गाड्या पेटवून दिल्याे. आता सरकारला लाज वाटत नाही का?’ असा जळजळीत सवाल पवारांनी केला. सांगलीतील हल्ल्याच्या प्रकारानंतर जितेंद्र आव्हाड यांना पोलिस संरक्षण का दिले जात नाही, यावरूनही पवारांनी सरकारला धारेवर धरले.