आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राधेश्याम मोपलवार यांची ‌उचलबांगडी; प्रकाश मेहतांची मात्र मुख्यमंत्र्यांकडून पाठराखण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - काेट्यवधी रुपयांची लाच मागितल्याचा अाराेप असलेले महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (एमएसआरडीसी) व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना पदावरून हटवण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी विधानसभेत जाहीर केला. 
 
लाच प्रकरण व इतर गुन्हेगारी प्रकरणांतील कथित संबंधांवरून मोपलवारांच्या निलंबनाची मागणी विराेधी पक्षाने अाक्रमकपणे लावून धरली हाेती. तसेच गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहतांच्या राजीनाम्यासाठीही विरोधक आक्रमक होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी माेपलवार यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेऊन विराेधकांना शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र मेहतांच्या राजीनाम्याच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांची पाठराखणच केली. दरम्यान, विरोधकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागणारे मेहता गुरुवारी विधानसभेत फिरकले नाहीत.  

‘मुख्यमंत्र्यांनी आमची अर्धीच मागणी पूर्ण केली. मोपलवारांच्या बाबतीत निर्णय घेतला, परंतु मेहतांना त्यांनी मोकळे सोडले,’ अशी तीव्र भावना यानंतर विरोधी सदस्यांनी व्यक्त केली. त्याच वेळी लातुरातील सेक्स रॅकेटच्या मुद्द्यावरून सत्ताधारी भाजपच्या महिला आमदारांनी आक्रमक रूप धारण केले. दोन्ही बाजूचे सदस्य आपापल्या मुद्द्यावर ठाम राहत घोषणाबाजी करू लागले. या गोंधळात चारदा सभागृहाचे कामकाज स्थगित करावे लागले. अखेरीस दिवसभरासाठी विधानसभेचे कामकाज तहकूब करण्यात आले.  

तत्पूर्वी गुरुवारी सकाळी अकरा वाजता विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यापासूनच विराेधकांनी मेहता-मोपलवारांच्या निलंबनाची मागणी लावून धरली. मेहता-मोपलवारांच्या निषेधाचे फलकही सभागृहात फडकवण्यात आले. अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत येऊन काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घोषणाबाजी केली. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार, जयंत पाटील यांनी मेहता- मोपलवारांच्या निलंबनाशिवाय कामकाज चालू न देण्याचा इशारा दिला.  
 
माेपलवारांवरील सर्व अाराेप अाघाडीच्या काळातीलच : मुख्यमंत्री  
मुख्यमंत्री म्हणाले, ‘मोपलवार चांगले की वाईट या मेरिटमध्ये मी जाणार नाही. चौकशीत जे तथ्य असेल ते बाहेर येईलच. मात्र, त्यांच्यावरचे आरोप यापूर्वीच्या सरकारच्या काळातील आहेत, याचे पुरावे मी देऊ शकतो. ‘समृद्धी’बद्दलचा एकही आरोप त्यांच्यावर झालेला नाही. तरीही सभागृहाच्या भावना लक्षात घेऊन त्यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय सरकार घेत आहे.’
 
खडसेंचा स्वत:हून राजीनामा
अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, हे सरकार भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. मेहतांच्या संदर्भात विरोधक एकनाथ खडसे यांच्या राजीनाम्याची आठवण करून देत अाहेत. मात्र, खडसे साहेबांनी स्वतःहून राजीनामा दिला. सरकारने घेतला नव्हता, हवे तर खडसेंनाच विचारा.
 
हाच न्याय मेहतांना का नाही : विखे : मोपलवारांना पदच्युत करण्याचा न्याय सरकारने मंत्री प्रकाश मेहता यांना का लावला नाही, अशी विचारणा करत त्यांच्या राजीनाम्यापर्यंत कामकाज चालू देणार नाही, असा इशाराही विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिला. 
 
हे पण वाचा,
बातम्या आणखी आहेत...